बांधकाम कामगारांची नगर पालिकेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:55 PM2018-11-13T23:55:16+5:302018-11-13T23:56:36+5:30
स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना शाखा सिंदी (रेल्वे)च्यावतीने बांधकाम कामगारावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तसेच विविध मागण्यांकडे न.प.चे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी एकत्र येत पालिका कार्यालयात धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना शाखा सिंदी (रेल्वे)च्यावतीने बांधकाम कामगारावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तसेच विविध मागण्यांकडे न.प.चे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी एकत्र येत पालिका कार्यालयात धडक दिली. या आंदोलनाचे नेतृत्त्व संघटनेचे अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी केले.
इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयात बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. सर्वच कामगार नोंदणीकृत ठेकेदाराकडे काम करीत नाही. अनेक घरमालकांकडे अस्थाई दैनंदिन बांधकाम कामगार म्हणून काम करतात. अशा अस्थायी स्वरुपाच्या बांधकाम कामगारांची मंडळाकडे नोंदणी व्हावी. त्यांना मंडळाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा. या मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेटून लावल्या.
सिंदी रेल्वे नगरपालिकेतील लिपीक शासनाच्या नियमांना पाठ दाखवत मनमानी कारभार करीत असल्याने त्याचा त्रास कामगारांना होत असल्याचा आरोप करीत या प्रकरणी न.प. प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सिंदी (रेल्वे) न.प. हद्दीमधील शेकडो बांधकाम कामगाराच्या नोंदण्या रिनिवल न झाल्यामुळे रद्द झाली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे प्रमाणपत्राची मागणी केली असता विविध कारणे पुढे करून उडवा-उडवीचेच उत्तरे दिल्या जातात. बांधकाम कामगारांना सात ही दिवस प्रमाणपत्र मिळावे अशी व्यवस्था नगरपालिकेत करावी तसेच उद्योग उर्जा कामगार विभाग अधिसुचना दि. १३ एप्रिल २०१४ नियम २००७ च्या ३३(३) या नियमाचे उल्लघंण केल्या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी. तसेच नगरपालिका हद्दीतील बांधकाम कामगारांना शासनाच्या मिळणाऱ्या योजने पासुन वंचित ठेऊ नये, आदी मागण्या न. प. मुख्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन न.प. मुख्याधिकारी डाके यांनी स्विकारले. आंदोलनात कैलाश गायकवाड, नाना कुंभारे, प्रतीभा अंबुलकर, प्रतिभा शिंदे, जीवनकला कुंभारे, राजेश्री तळवेकर, कैलास लोहकरे, पांडुरंग सोनटक्के यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील बांधकाम कामगार सहभागी झाले होते.