कामगारांचे बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:39 AM2017-07-20T00:39:12+5:302017-07-20T00:39:12+5:30
भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीतील सात कामगारांना कामावरून कमी करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ‘त्या’ सात जणांना कामावर घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीतील सात कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. त्यांना कामावर घेण्याचे आदेश कामगार अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून दिले होते. तसे पत्रही काढण्यात आले असून कंपनी प्रशासनाने कामगारांना कामावर घेतले नसल्याचा आरोप करीत या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनादरम्यान कामगारांना कामावर घेण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून २२ मे २०१७ ला सदर सात कामगार कंपनीप्रशासनाने कामावर घेण्याचे लेखी आदेश कामगार अधिकाऱ्यांनी दिले होते; पण सदर कामगारांना कामावर घेण्यात आले नाही. साध्या चर्चेलाही कंपनी प्रशासन तयार नाही. कामगारांना कामावर घ्यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिलिंद भेंडे, आकाश नरसिंगकर, दिनेश नरड, चरण मसराम, हेमराज पोहाणे, महेश गाडेगोने, संदीप देशमुख यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.