आर्थिक विवंचनेतून गिरणी कामगाराने संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:19+5:30

ओमप्रकाश येसनकर मागील ३० वर्षांपासून सेवाग्राम येथील बापूरावजी देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीत कामगार म्हणून काम करीत होते. त्याच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ओमप्रकाश हा घरातील कर्ता पुरुष होता. तोच त्याच्या कुटुंबाचा गाडा ओढत होता. असे असले तरी मागील तीन महिन्यांपासूनचे वेतन कंत्राटदाराने दिले नसल्याने त्यांच्या परिवारावर आर्थिक संकटच कोसळले.

Worker's life ended by financial crunch | आर्थिक विवंचनेतून गिरणी कामगाराने संपविले जीवन

आर्थिक विवंचनेतून गिरणी कामगाराने संपविले जीवन

Next
ठळक मुद्देगळफास लावून केली आत्महत्या । संतप्तांचा पोलिसांना घेराव

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील एमआयडीसी भागातील बापूराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीतील कामगार ओमप्रकाश अंबादास येसनकर (५०) रा. हावरे ले-आऊट, सेवाग्राम याने आर्थिक विवंचनेला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. कंत्राटदाराच्या कामगारविरोधी धोरणामुळे ओमप्रकाश याने आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतल्याचा आरोप करीत संतप्त कामगारांनी पोलिसांनाच घेराव घातला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांच्या मध्यस्थीअंती संतप्तांनी आपले आंदोलन मागे घेतले.
ओमप्रकाश येसनकर मागील ३० वर्षांपासून सेवाग्राम येथील बापूरावजी देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीत कामगार म्हणून काम करीत होते. त्याच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ओमप्रकाश हा घरातील कर्ता पुरुष होता. तोच त्याच्या कुटुंबाचा गाडा ओढत होता. असे असले तरी मागील तीन महिन्यांपासूनचे वेतन कंत्राटदाराने दिले नसल्याने त्यांच्या परिवारावर आर्थिक संकटच कोसळले. ओमप्रकाशसह त्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या ओमप्रकाशने शुक्रवारी त्याच्या पत्नीच्या नावाने एक चिठ्ठी लिहून घराबाहेर पाय काढला. काही वेळानंतर ओमप्रकाशच्या पत्नीने सदर चिठ्ठी बघितली असता तिने झटपट सेवाग्राम पोलीस ठाणे गाठले. तेथे ओमप्रकाश बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.
शोध सुरू असताना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या मागील आवारात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार उजेडात येताच घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.
पंचनामा करतेवेळी पोलीस कर्मचाऱ्यांना ओमप्रकाशच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात तीन महिन्याचे वेतन कंत्राटदाराने न दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याच्या आशयाचा मजकूर लिहून असल्याचे पोलिसांनी सांगितले. ओमप्रकाशच्या आत्महत्येची वार्ता परिसरात आणि गिरणी कामगारांमध्ये वाऱ्यासारखी पसरल्याने शनिवारी संतप्त कामगारांनी सेवाग्राम येथील रुग्णालयात एकच गर्दी केली होती. एकत्र आलेल्या कामगारांनी ठिय्या देत कंत्राटदाराच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. जोपर्यंत सूतगिरणीचे अधिकारी येऊन चर्चा करीत नाही, तोपर्यंत येथून मृतदेह उचणार नाही, असा पावित्रा कामगारांनी घेतला होता. शिवाय पोलिसांनाच घेराव घालण्यात आला. गिरणी कामगारांनी मृत कामगाराच्या कुटुंबीयांना गिरणी प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी रेटल्याने परिसरात काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कामगारांच्या आंदोलनाची माहिती मिळताच सेवाग्रामचे ठाणेदार कांचन पांडे यांनी कामगार युनियनचे अध्यक्ष नरेंद्र पेटकर, अनिल राऊत, देविदास बोडखे, नाना चावरे, विनोद पेरकुंडे, रामा भोयर, गजानन वादूरकर, गजानन ठाकरे, विजय डोहरवाद, सुनील माटे, बाबाराव बैले, शरद शिंदे यांच्याशी चर्चा केली. पोलिसांच्या मध्यस्तीअंती तोडगा निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

दोन चिठ्ठ्या लिहून आत्महत्येचा कठोर निर्णय
पंचनामा करताना ओमप्रकाश याच्या खिशात असलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली तर या चिठ्ठीव्यतिरिक्त दुसरी चिठ्ठी मृत ओमप्रकाश याने पत्नीच्या नावाने लिहिली होती. या दोन्ही चिठ्ठ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून पत्नीला लिहिलेल्या चिठ्ठीतून ओमप्रकाश याने त्याच्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करणारा मजकूर लिहिला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

कंत्राटदाराच्या कार्यप्रणालीवर ओढले ताशेरे
सूतगिरणीतील कंत्राटदार बद्रीनाथ आणि एकाने मला ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे वेतन न दिल्याने माझ्यासह माझ्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत असून कंत्राटदाराच्या दुर्लक्षित धोरणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, अशा आशयाचा मजकूर मृताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत नमूद असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

ओमप्रकाश येसनकर हा बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या खिशातील आणि त्याने त्याच्या पत्नीला लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेण्यात आली आहे. या दोन्ही चिठ्ठीतील मजकुरावरून आर्थिक विवंचनेमुळे ओमप्रकाशने आत्महत्या केल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल.
- कांचन पांडे, ठाणेदार, सेवाग्राम.

Web Title: Worker's life ended by financial crunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू