श्रमदानातून दगडी बांध अन् शोषखड्डे
By Admin | Published: April 18, 2017 01:16 AM2017-04-18T01:16:29+5:302017-04-18T01:16:29+5:30
जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धा सुरू होताच श्रमदानाने काय होऊ शकते याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.
विरुळात जलक्रांतीचे तुफान : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा
विरूळ (आकाजी) : जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धा सुरू होताच श्रमदानाने काय होऊ शकते याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. विरूळ येथे श्रमदानातून दगडी बांध, दीडशे शोषखड्डे, वृक्षारोपणाकरिता एक हजार खड्डे नागरिकांनी स्वत: तयार केले. समतल चर आणि तलाव खोलीकरण, विहीर पुनर्भरणाचे कामही जोरात सुरू आहे. या कामाकरिता नागरिक सकाळी आणि सायंकाळी उत्साहाने श्रमदान करीत आहेत. यातून गावात तीन नव्या तलावांची निर्मिती करण्यात येत आहे.
जलयुक्त शिवाराकरिता शेतकऱ्यांच्या भेटी व गावकऱ्यांच्या गृहभेटी आणि मुख्य चौकात पाणी बचत आणि त्याचा काटकसरीने वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. पाणी वापरातून टंचाईवर मात करण्यासाठी करावयाच्या योजनांची चित्रफित दाखवित जानजागृती होत आहे. पावसाच्या पाण्याचा थेब न थेंब गावतच जिरवून गाव पाणी टंचाईमुक्त व शिवार जलयुक्त करण्यासाठी गावकरी सरसावले आहे. यासाठी सरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहे. तहसीलदार पवार यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.(वार्ताहर)
वॉटर कपसाठी हजारो हात लागले कामाला...
आर्वी तालुव्यात विरूळ (आकाजी) या गावाची वॉटर कपकरिता निवड झाली. आता आपण आघाडी घ्यायची, असे म्हणून गावकऱ्यांनी आपसी मतदभेत विसरून पाण्याची पातळी वाढविण्याचा संकल्प केला. पाण्याच्या बचतीकरिता व त्याच्या साठवणुकीकरिता मोठ्यांपासून चिमुकलेही सकाळी सहा वाजता उठून तलाव व नाल्याच्या खोलीकरणाच्या कामाला येत असल्याचे दिसते.
पांजरा येथे काम सुरू
रोहणा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २ मध्ये पांजरा (बोथली) या गावाची निवड झाली आहे. येथे श्रमदानाने कामाला प्रारंभ झाला आहे. शोषखड्डे, वनीकरणाचे खड्डे, दगडी बांधाचे काम सुरू झाले आहे. पाण्याचे महत्त्व व काळाची गरज लोकांना समजावी म्हणून लोकप्रबोधनाचे कार्यक्रमदेखील गावात सुरू आहेत. श्रमदानात प्रदीप डोळे, कलावती खंडाते, चंद्रकला श्यामकोल, ईश्वर कासार, ग्रामसेवक शेळके, स्वयंसेवक दिवाकर आसटकर यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच तथा समस्त गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. या कामात भगिनींचा सहभाग उल्लेखनीय असून सदर स्पर्धा गावातील भूजल पातळी वाढविण्यासाठी नक्कीच सहायभूत ठरेल असे चित्र आहे.(वार्ताहर)