वर्धेत कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रकल्पावर आज कार्यशाळा
By admin | Published: March 10, 2017 12:52 AM2017-03-10T00:52:20+5:302017-03-10T00:52:20+5:30
निसर्गात पक्ष्यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे असून या पक्ष्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे.
पक्षी निरीक्षणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
वर्धा : निसर्गात पक्ष्यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे असून या पक्ष्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. या संदर्भात पक्षीमित्रांना माहिती देण्याकरिता वर्धेतील इआरसीएस व रामकृष्ण बजाज कृषी विद्यालय, पिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवारी सकाळी १० वाजता रामकृष्ण बजाज कृषी विद्यालयात कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत बाहेर जिल्ह्यातील ३० पक्षीमित्र सहभागी होऊ शकणार असून जो पहिले येईल त्याचा प्रवेश निश्चित होईल, असे आयोजकांनी कळविले आहे.
सदर प्रकल्प वर्धेत एन्व्हार्मेंटल रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटी, इंडिया (ईआरसीएस) राबवत असून हा प्रकल्प राबविताना पक्ष्यांच्या वैज्ञानिक पद्धतीने नोंदी कशा घ्याव्यात व सामान्य पक्षी कसे व का अभ्यासावे याची माहिती या कार्यशाळेत देण्यात येत आहे. सदर कार्यशाळेत बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे नंदकिशोर दुधे मार्गदर्शक म्हणून राहणार आहेत. या कार्यशाळेस डॉ. बाबाजी घेवडे, ईआरसीएसचे संजय इंगळे तिगावकर, शिक्षा मंडळाचे अतुल शर्मा व रामकृष्ण बजाज कृषी विद्यालयाचे प्राचार्य डी. के. सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यशाळेकरिता ईआरसीएसचे वैभव देशमुख, जयंत सबाने, पराग दांडगे परीश्रम घेत आहेत.
आधुनिक होणे म्हणजे निसर्गाशी दुरावा घेणे नव्हे. आधुनिकीकरणासह आपण निसर्गाशी जवळीक साधायला हवी. स्थानिक जैविक संपत्तीचे जतन व संवर्धन हे परिसरात राहणारे लोकच जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात. स्थानिक जैवविविधतेच्या नोंदीही स्थानिक लोक जास्त प्रभावीपणे घेऊ शकतात, याच वास्तविकतेला जाणून बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने कॉमन बर्ड मॉनीटरिंग हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय धेतला आहे.
या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या त्या-त्या भागातील लोकांना पक्षी अभ्यासण्याच्या वैज्ञानिक पद्धती शिकवण्यासाठी पुढकारही घेतला आहे.(प्रतिनिधी)