कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्यामुळे कार्यालयीन कामांचा खेळखंडोबा
By admin | Published: November 7, 2016 12:50 AM2016-11-07T00:50:02+5:302016-11-07T00:50:02+5:30
विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कार्यालयीन कामांचा खोळंबा होतो
मुख्यालयी राहण्याचा नियम शासकीय कर्मचाऱ्यांकडून पायदळी
पुलगाव : विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कार्यालयीन कामांचा खोळंबा होतो. याकरिता शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचा नियम तयार केला. मात्र जिल्ह्यातील विविध कार्यालयातील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे चित्र आहे.
नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याने ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसते. रेल्वेस्थानक, बसस्थानक येथे सकाळी ९ ते १० च्या सुमारास प्रवासी कर्मचाऱ्यांची गर्दी पाहिली तरी अंदाज येतो. घटनादुरुस्तीमुळे प्रशासकीय यंत्रणेला बळकटी येईल, अशी वल्गना केली जात असताना ग्रामविकास अधिकारी, महसूल यंत्रणेतील तलाठी, जिल्हा परिषदेचे शिक्षक, वनविभाग, जलसंधारण, पाटबंधारे, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा पुरवठा विभाग, समाजकल्याण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय, हिवताप विभाग, खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील अशा विविध सरकारी, निमसरकारी विभागातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहता बाहेर गावावरुन नित्याने ये-जा करताना दिसतात. त्यामुळे कामाची वेळ ही अर्ध्यावरच येते. कार्यालयीन वेळ प्रवासात जात असल्याने कामाचा खेळखंडोबा होतो. कामानिमित्त तालुकास्थळी आलेल्या नागरिकांना अडचणींना सामना करावा लागतो. शासनाच्या अधिनियमाद्वारे कर्मचाऱ्यांना सेवा, शिस्त, वर्तणूक अशा कर्तव्याचा मापदंड घालून दिला असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून त्याला छेद दिला जात आहे. कित्येक जण मुख्यालयी राहत नसताना घरभाडे भत्ता घेत असल्याची माहिती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करुन कारवाई केल्यास याला चाप बसेल. तसेच सर्वसामान्यांची कामे त्वरीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)