सौर ऊर्जा व मोजमाप यंत्रणेवर कार्यशाळा
By admin | Published: June 25, 2014 12:38 AM2014-06-25T00:38:00+5:302014-06-25T00:38:00+5:30
महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेमध्ये भारत सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर उर्जा मिशन अंतर्गत पवन ऊर्जा तंत्रज्ञान केंद्र चैन्नई यांच्यावतीने ‘सौर ऊर्जा मोजमाप यंत्रणा’ ची स्थापना
वर्धा : महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेमध्ये भारत सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर उर्जा मिशन अंतर्गत पवन ऊर्जा तंत्रज्ञान केंद्र चैन्नई यांच्यावतीने ‘सौर ऊर्जा मोजमाप यंत्रणा’ ची स्थापना व उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी एमगिरीचे संचालक डॉ. पी. बि. काळे अध्यक्षस्थानी होते. उद्घाटक म्हणून खासदार रामदास तडस होते.
सौर ऊर्जा मोजमाप यंत्रणाच्या व्यवस्थापन व कार्यसंचालन विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. याकरिता वेगवेगळ्या राज्यातून अधिकारी सहभागी झाले होते. याप्रसंगी बोलताना तडस म्हणाले, सौर ऊर्जा हा अखंड स्वरुपात उपलब्ध असणारा ऊर्जा स्त्रोत आहे. या ऊर्जेचा वापर करुन वीज निर्मिती करणे शक्य आहे. सदर वीज निर्मिती प्रकल्प स्थळावर प्राप्त होणाऱ्या सौर किरणावर अवंलबून असते. या सौर किरणाचा अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास एका ठिकाणी किती प्रमाणात सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती करता येऊ शकेल याची माहिती उपलब्ध होते. यासाठी राज्यातील निरनिराळ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये सौर प्रारणाचा अभ्यास करुन योग्य सौर ऊर्जा प्रकल्प क्षेत्राची निवड करणे शक्य होण्यासाठी एमगिरी मध्ये सौर प्रारण मापन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या यंत्रणेच्या स्थापनेमुळे वातावरणा संबंधित माहिती मिळणार ज्याचा शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार असल्याची माहिती दिली.
यानंतर बोलताना काळे यांनी म्हणाले, या यंत्रणेच्या स्थापनेमुळे सौर ऊर्जे संबंधित अधिकाधिक माहिती मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये आजवर या प्रकारचे १३ केंद्र स्थापित केले आहे. त्यापैकी एमगिरी हे एक आहे. याकरिता मंत्रालयाचे प्रतिनिधी डॉ. गिरीधरयांनी सहकार्य केले. या यंत्रणे सारख्याच आणखी वेगवेगळ्या यंत्रणा एमगिरीला मिळवून दिल्यास ग्रामीण लोकांना जास्तीत जास्त माहिती व सुविधा प्राप्त होऊ शकेल, असे सांगितले.
या कार्यशाळेला मंत्रालयाचे प्रतिनिधी डॉ. गिरीधर, डॉ. विभा गुप्ता, डॉ. करुणाकरण, प्रकाश पोहरे तसेच एमगिरी संस्थाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जयकिशोर छंगाणी यांनी केले. कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थी यांना तासंबंधी माहिती देऊन तंत्रज्ञान समजावून सांगण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)