रोखरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी कार्यशाळा
By admin | Published: December 26, 2016 01:59 AM2016-12-26T01:59:27+5:302016-12-26T01:59:27+5:30
नोटबंदीमुळे रोख रकमेचा तुटवडा व २००० रुपयांसारख्या मोठ्या नोटांमुळे व्यवहारात सुट्या पैशांची समस्या
विद्याभारती विद्यालयात विद्यार्थ्यांना माहिती
सेलू : नोटबंदीमुळे रोख रकमेचा तुटवडा व २००० रुपयांसारख्या मोठ्या नोटांमुळे व्यवहारात सुट्या पैशांची समस्या निर्माण झाली. यामुळे सामान्यांना त्रास होत आहे. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने रोखरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी उपक्रम राबविले. विद्याभारती विद्यालयातही विद्यार्थी व नागरिकांसाठी कार्यशाळा घेत कॅशलेस व्यवहारांबाबत माहिती देण्यात आली.
याप्रसंगी डॉ. अजय पेठे यांनी रोख विरहीत व्यवहारांबाबत मार्गदर्शन केले. प्रामुख्याने रोखरहित व्यवहार म्हणजे काय, या व्यवहारांचे फायदे व गरज विषद केली. रोख विरहित व्यवहार करण्याच्या पाच पद्धतींवर प्रकाश टाकला. यात युनिफाईड पेमेंट इंटरफेस, ई-वॉलेट, कार्डस्, पीओएस, आधार सक्षम पेमेंट सिस्टीम व अविस्तृत पूरक सेवा माहिती यांचा समावेश होता. पाचही पद्धतीद्वारे रोख विरहित व्यवहार कसे पार पाडले जातात, याचे प्रात्यक्षिक दिले. रोख विरहित व्यवहार करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने या पद्धतीचा अवलंब करून सुरळीत व्यवहार करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. नागदिवे यांनी वाणिज्य विभागाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले. विशेष अभियान म्हणून सर्वांनी रोख विरहीत व्यवहाराला चालना देणे हे राष्ट्रीय कर्तव्य ठरते, असे मत प्राचार्य डॉ. संजय कानोडे यांनी व्यक्त केले. रोखरहित व्यवहारांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. भास्कर घैसास, संचालन डॉ. नागदिवे यांनी केले तर आभार डॉ. पराग कावळे यांनी मानले. कार्यक्रमाला. प्रा. डंभारे, डॉ. निकम, हरिभाऊ, नारायण आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)