बापू व बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:24 AM2018-04-22T00:24:34+5:302018-04-22T00:24:34+5:30
हा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी याच ठिकाणावरून सूत्र हलविली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : हा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी याच ठिकाणावरून सूत्र हलविली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढा दिला आहे. दुसरीकडे राज्यघटनेच्या माध्यमातून देशवासियांना चाकोरीविरूद्ध जीवन प्रदान करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राज्याचे रहिवासी राहिले आहे. त्यामुळे बापू व बाबासाहेब या दोन्ही महामानवाच्या स्मृती जोपासण्यासाठी सेवाग्राम येथे जागतिक दर्जाचे स्मारक करण्यासाठी प्रयत्न होत आहे, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी दिली. डॉ. आंबेडकर ग्रंथालयाचे लोकार्पण व उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
नगर परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती विद्या भुजाडे, टायगर सेनेचे दादा शेळके, गटनेता शोभा तडस, न.प. सभापती कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनिता ताडाम, सुनिता बकाणे, न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे व प्रदीप वानखेडे यांची उपस्थिती होती.
खा. तडस पुढे बोलताना म्हणाले, उच्च शिक्षणापासून वंचित ठरलेल्या समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाची व राहण्याची सोय म्हणून याठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या नावाने वसतीगृहाची निर्मिती केली जाणार आहे. या ग्रंथालयाला आधी सुसज्ज करण्यासाठी तसेच डॉ. आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणासाठी १० लाखांचा खासदार निधी दिला जाणार असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात ग्रंथालयाचे लोकार्पण तसेच उद्यानाचे भूमिपूजन खा. तडस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात प्रा. मदनकर, शेळके व वानखेडे यांनीही विचार व्यक्त केले. सिने अभिनेत्री अंजली भारती यांचा बुद्ध, फुले, शाहू तसेच भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. संचालन माजी नगरसेवक रितेश लोखंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अंशुल कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाला न.प. सदस्य मारोती मरघाडे, संगीता तराळे, अब्दुल नईम, तसेच भाजपाचे महामंत्री दशरथ भुजाडे, मारोती लोहवे, आनंद सांडे, अवधूत बेंदले, सुरेश ताकसांडे तसेच न.प. अधिकारी कर्मचारी नागरिकांची उपस्थिती होती.
सेवाग्राम विकास आराखड्यातून अनेक कामे
महात्मा गांधी यांच्या अनेक आठवणी जिल्ह्यात आहेत. त्या आठवणी देशाना प्रेरणा देणाऱ्या आहेत. या आठवणींना उजाळा देण्याकरिता आणि त्याची माहिती सर्वसामान्यांना होण्याकरिता जिल्ह्यात सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यातून मोठ्या प्रमाणात काम सुरू असून तो प्रकल्प पूर्णत्त्वास जात आहे.