जागतिक जलदिन: ६० टक्के पाण्याचा होतोय दररोज अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:12 AM2018-03-22T10:12:39+5:302018-03-22T10:12:49+5:30

World Water Day: daily 60 percent water wastage | जागतिक जलदिन: ६० टक्के पाण्याचा होतोय दररोज अपव्यय

जागतिक जलदिन: ६० टक्के पाण्याचा होतोय दररोज अपव्यय

Next
ठळक मुद्देरेन वॉटर हार्वेस्टींग, जलस्त्रोतांना संजीवनीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तंत्रज्ञानाने श्रीमंत होणारे जग २१ व्या शतकात नैसर्गिक संसाधनांनी गरीब होत आहे. जलस्त्रोत मृत होत आहे. भूजल पातळी प्रचंड खालावत असताना ६० टक्के पाण्याचा दररोज अपव्यय होत आहे. ही जलसंकटाची नांदी आहे. यावर रेन हार्वेस्टींग हा एक पर्याय आहे. शिवाय मृत जलस्त्रोतांना संजीवनी देणे गरजेचे आहे. जागतिक जलदिनी शासन, प्रशासन, संस्था, संघटना, नागरिकांनी यावर कृतिशील विचार करणे क्रमप्राप्त ठरत आहे.
सध्या जलस्त्रोतांची वाटचाल मृतावस्थेकडे होत आहे. जागतिक पातळीवर २२ मार्च जलदिन पाळला जातो; पण तो सार्थकी लागतोय का, हा प्रश्न आहे़ जलस्त्रोत व जलसाठा असलेल्या भारत देशातही पावसाच्या पाण्याची साठवण क्षमता अत्यंत कमी झाली आहे. सातत्याने भूजल पातळी घटत असून नैसर्गिक जलस्त्रोत मृत होत आहे. हे जलसंकट टाळण्यासाठी जलदिनी प्रामाणिक संकल्प व प्रत्यक्ष कृतीची कास धरणे गरजेचे आहे. देशातील पर्वत, टेकड्या, जंगले, नद्या, नाले, तलाव, गावतलाव, सिंचन प्रकल्प यांच्या नोंदी घेतल्यात; पण त्या काळात दर्शविलेले जलस्त्रोत त्याच स्थितीत, क्षमतेत आज अस्तित्वात आहेत काय, वर्तमान स्थिती काय याची शासन दरबारी नोंद नसल्याचे दिसते. काही प्रमाणात स्वाभाविक रचना म्हणजे ‘टोपोग्राफी’ पाहणी करण्यात आली होती; पण त्याचे फलित कृतीत उतरलेले नाही.
ग्रामीण भागात प्रती व्यक्ती प्रतिदिन ४० लिटर तर शहरांत १५० लिटर पाण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून हे पाणी पिण्याचे म्हणून दिले जाते; पण त्यातील ६० टक्के पाण्याचा शौचालय, स्रानगृह, अंगणात टाकणे, वाहने धुणे यात अपव्यय होत आहे. केवळ ४ ते ६ टक्के पाणी पिण्याकरिता वापरले जाते. हा अपव्यय रोखणे तथा जलस्त्रोत बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत निकडीचे आहे. अन्यथा जलसंकटाची टांगती तलवार कायम राहणार, हे निश्चित!

काय कराव्या उपाययोजना
पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे रेन वॉटर हार्वेस्टींगद्वारे शक्य आहे. यात छताच्या पावसाचे जमिनीत पुनर्भरण, शहरात पाण्याच्या वापरावर नियंत्रण, वने व कृषी क्षेत्रात तळ्यांची निर्मिती, सिंचनासाठी ठिबक, तुषार आदी पद्धतींचा वापर करणे गरजेचे आहे. लहान धरणे, बंधाऱ्यांची निर्मिती करणे, उद्योगांनी पाण्याचा वापर कमी करून प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर करणे, सांडपाणी शुद्ध करून उद्योग व बाह्य कामासाठी वापर करणे, नदी, नाल्यांचे संवर्धन करून नियोजन करणे तथा पाण्याचा दुरूपयोग टाळण्यासाठी जलसाक्षरता करून बाष्पीभवन थांबविण्यास्तव धरणे, कालव्यांवर सोलर पॅनल लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: World Water Day: daily 60 percent water wastage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी