दारूमुक्त भारतासाठी विश्वशांती पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:10 AM2019-02-11T00:10:57+5:302019-02-11T00:15:48+5:30
महात्मा गांधींनी दारुमुक्त भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे ते स्वप्न साकार करण्यासोबतच त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवून विश्वात शांती निर्माण करण्यासाठी विश्वशांती पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा रविावारी सेवाग्राम आश्रमात नतमस्तक होऊन पुढील प्रवासाकरिता निघाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम: महात्मा गांधींनी दारुमुक्त भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे ते स्वप्न साकार करण्यासोबतच त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवून विश्वात शांती निर्माण करण्यासाठी विश्वशांती पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा रविावारी सेवाग्राम आश्रमात नतमस्तक होऊन पुढील प्रवासाकरिता निघाली.
महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंती महोत्सवा निमित्ताने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी १२ जानेवारीला पुण्यातून या विश्वशांती पदयात्रेला सुुरुवात झाली. देशातील युवक-युवती ही देशाची ताकद असल्याने बापू व बा च्या जीवनकार्याचा संदेश देशाकरिता आवश्यक आहे. तो संदेश पोहचविण्याचे काम या यात्रेत सहभागी असलेले योगेश माथुरिया, आश्रमचे जालंधरनाथ, गणेश सूर्या, गिरीश कुलकर्णी व अॅड. शाम आसवा करीत आहे. रविवारी ही यात्रा आश्रमात पोहचल्यावर आश्रमच्या ज्येष्ठ गांधीवादी कुसूम पांडे, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवचरण ठाकूर, सचिन हूड यांनी सुतमाळेने यात्रेकरुंचे स्वागत केले. बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना व भजन करण्यात आले. यावेळी जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गुजर, अभिमन्यू भारतीय, भाई रजनीकांत, संदेश राऊत, पंडित चन्नोळे, आकाश लोखंडे, दिनेश गणवीर, रामसिंह बघेल, रुपेश कडू, अशोक वहिवटकर, इस्लाम हुसैन, प्रभा शहाने, सोनू उंबरकर, सुचित्रा झाडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जालंधरनाथ म्हणाले की, नुकतीच द. आफ्रिकेत पदयात्रा करुन आलो. त्याचाच एक भाग म्हणून पुणे ते बांग्लादेश व जपान अशी यात्रा करीत आहे.
गांधी १५० हे औचित्य असले तरी त्यांच्या विचायाची गरज आहे. अकरा वर्षापासून पदयात्रेच्या माध्यमातून बापू व बा यांचा संदेश पोहचविण्याचे कार्य करीत आहे. बापूंनी मेरा जीवन ही संदेश है, असे म्हटले. त्यानुसार ‘मेरे हाथ ही मेरा संदेश है’. आता हातावरील संदेश माझे जीवन बनले आहे, असेही ते म्हणाले. ही यात्रा आता सेवाग्राम, तरोडा, भिवापूर, रायपूर, छत्तीसगड, ओडिसा, बंगाल, बांगलादेश, जपान अशा सतरा देशात फिरणार असून २१ सप्टेंबर २०२० ला विश्वशांती दिवसाला जिनेव्हा येथे यात्रेचा समारोप होणार आहे. आतापर्यंत ८१३ कि.मी.चा प्रवास केल्याचे यात्रेकरु योगेश माथुरिया यांनी सांगितले.