अबब! दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ६.२५ कोटींचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 11:50 AM2022-03-11T11:50:20+5:302022-03-11T12:01:20+5:30
शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम दारूविक्री केली जात असल्याचे दिसून येते. अनेकदा पोलीस कारवाई करतात. मात्र, कठोर कायदा अंमलात न आल्याने अवघ्या काही वेळात दारूविक्रेत्याला जामीन मिळतो अन् पुन्हा तो दारूविक्रीसाठी सज्ज होतो.
चैतन्य जोशी
वर्धा :वर्धा जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला असल्याने १९७४ मध्ये दारूबंदी करण्यात आली. मात्र, ही दारूबंदी केवळ नावालाच राहिली असून, गेल्या वर्षभराच्या कालावधीत पोलिसांनी तब्बल ६ कोटी २५ लाख ६२ हजार १६८ रुपयांचा देशी विदेशी दारूसाठा जप्त करुन गावठी दारूसाठा नष्ट केला आहे. त्यामुळे वर्ध्यातील दारूबंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते.
जिल्ह्यातील दारूविक्री रोखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. वर्धा, गडचिरोलीच्या धर्तीवर चंद्रपूरमध्येही दारूबंदी करण्यात आली होती. मात्र, चंद्रपूरची दारूबंदी उठल्यानंतर वर्ध्यातही याचे पडसाद उमटले अन् काही सामाजिक संघटनांकडून वर्ध्यातील दारूबंदी उठविण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, वर्धा जिल्ह्याला गांधींचा, विनोबांचा वारसा लाभल्याने हे शक्य होऊ शकले नाही.
शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम दारूविक्री केली जात असल्याचे दिसून येते. अनेकदा पोलीस कारवाई करतात. मात्र, कठोर कायदा अंमलात न आल्याने अवघ्या काही वेळात दारूविक्रेत्याला जामीन मिळतो अन् पुन्हा तो दारूविक्रीसाठी सज्ज होतो. पंचाची फितुरी न्यायालयात आरोपी दारूविक्रेत्याला निर्दोष सोडण्यास फायदेशीर ठरते. यामुळेच दारूविक्रेत्यांचे मनसुबे वाढल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अनेक पोलीस अधीक्षक येऊन गेले; पण दारूविक्री मात्र कायमस्वरुपी बंद झालेली दिसली नाही. त्यामुळे दारूबंदी जिल्ह्यात दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर कायदा करून स्थानबद्ध किंवा तडीपारीची कारवाई करण्याची नितांत गरज आहे.
न्यायालयात अनेक केसेस ‘पेंडिंग’
दारूविक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यानंतर न्यायालयात प्रकरण दाखल केले जाते. एकट्या वर्धा जिल्ह्यात सुमारे सात ते आठ हजारांवर दारूविक्रेत्यांच्या केसेस पेंडिंग असल्याची माहिती आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पंचांची फितुरी. त्यातच पकडलेल्या दारूच्या नमुन्यांचा अहवाल लवकर मिळत नाही. त्यामुळे न्यायालयाचा वेळही वाया जातो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
एकतर खुली करा, अन्यथा बंद करा
जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूविक्री सुरू आहे. अनेक दारूविक्रेते बनावट दारूची विक्री करतात. याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे जर दारूविक्री होतेच आहे तर कायमस्वरुपी खुली करा, अन्यथा पूर्णपणे बंद करा, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.