तुम्हाला व्होटर स्लिप मिळाल्या असत्या तर वाढला असता मतदानाचा टक्का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 05:36 PM2024-05-15T17:36:58+5:302024-05-15T17:38:22+5:30
मतदारांमध्ये नाराजीचा सूर : किती कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा लोकसभेकरिता दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान झाले असून बऱ्याच मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला. ज्यांनी आतापर्यंत सातत्याने मतदानाचा हक्क बजावला, त्यांचेही नावे मतदार यादी मिळाले नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला. इतकेच नाही, तर बहुतांश मतदारांपर्यंत मतदानाच्या दिवसापर्यंत व्होटर स्लिपही मिळाल्या नसल्याने सर्व गोंधळ उडाला. याची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी मतदारांकडून करण्यात आली.
वर्धा लोकसभेच्या सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण १६ लाख ८२ हजार ७७१ मतदार असून त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता जिल्हा प्रशासनाने सर्व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. प्रत्येक बीएलओ यांना मतदानापूर्वी सर्व मतदारांना व्होटर स्लिप पोहोचत्या करण्याच्या सूचनाही केल्या होत्या, परंतु बहुतांश भागात मतदारांना व्होटर स्लिपच पोहोचल्या नाही. मतदान केंद्रावरील मतदान यादीत मतदारांना शोधुनही नाव न मिळाल्याने अनेकांना हक्क न बजावताच घरी परतावे लागले. परिणामी, १० लाख ७२ हजार ६५७ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभा क्षेत्रातील मतदानाची टक्केवारी ६४.८५ टक्के इतकी राहिली असून सर्वांनाच वेळीच व्होटर स्लिप उपलब्ध झाल्या असत्या, तर ही टक्केवारी आणखी वाढली असती, असेही मतदारांनी बोलून दाखविले. ज्यांच्या हलगर्जीपणामुळे मतदारांना या लोकोत्सवापासून वंचित राहावे लागले, त्याबद्दल कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, पण अद्यापही कुणावरच जबाबदारी निश्चित केली नसल्याची माहिती आहे.
अद्याप नोटीस कुणालाच नाही
मतदानाचा टक्का वाढावा, याकरिता जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आली, परंतु प्रशासनातीलच काही चुकांमुळे मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिल्याचे चित्र आहे. मतदारांना व्होटर स्लिप मिळाल्या नसल्यामुळे त्यांना मतदान केंद्रावर गेल्यावर मतदार यादीत नाव नसल्याचे कळले. परिणामी, मतदारांना मतदान न करताच घरी परतावे लागल्याने रोष व्यक्त केला, पण अद्याप एकालाही प्रशासनाकडून नोटीस बजावली नाही आणि जाबही विचारला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
स्लिप ऑनलाईन डाऊनलोड करता येणार
मतदानाचा हक्क बजावता यावा, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, याकरिता निवडणूक आयोगाकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. मतदार यादीतील नावे, मतदान केंद्र आदी नावे तपासणीकरिता ऑनलाइन अॅपही उपलब्ध होता, परंतु ग्रामीण भागातील बऱ्याच मतदारांना या सुविधेचा लाभ घेता आला नसल्याने त्यांना व्होटर स्लिप घरपोच देणे क्रमप्राप्त होते.
वाटपासाठी हजार कर्मचाऱ्यांची फौज
वर्धा लोकसभा मतदार संघात १ हजार ९९८ मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रत्येक बुथनिहाय बीएलओची नियुक्ती करून त्यांच्या मतदार केंद्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक मतदारांपर्यंत व्होटर स्लिप पोहोच- विण्याची जबाबदारी सोपविली होती. काही बीएल ओनी ही जबाबदारी पार पाडली असून, काहींनी यात कुचराई केल्याचे दिसून आले.