जखमी बिबट्याचे पिलू मातेपासून भरकटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:45 PM2018-05-26T23:45:20+5:302018-05-26T23:45:20+5:30
हिंगणी वनपरिक्षेत्राच्या झडशी सहवन क्षेत्रातील मदनी बिटातील शंकर दिघडे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट मादी व दोन पिल्ले आढळून आल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी हिंगणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे, खरांगणाचे ए.एस. ताल्हण, खरांगणा ठाणेदार निशीकांत रामटेके हे दाखल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : हिंगणी वनपरिक्षेत्राच्या झडशी सहवन क्षेत्रातील मदनी बिटातील शंकर दिघडे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट मादी व दोन पिल्ले आढळून आल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी हिंगणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे, खरांगणाचे ए.एस. ताल्हण, खरांगणा ठाणेदार निशीकांत रामटेके हे दाखल झाले. जखमी पिल्लाच्या पायावरील उपचारकरिता त्याला पिपल्स फॉर अॅनिमलकडे सोपविण्यात आले आहे.
दिघडे यांचे शेत हे मदन उन्नई धरणाला लागून आहे. दुपारच्या सुमारास गावातील काही युवक मासेमारी करण्याकरिता धरणावर जात असताना त्यांना धुऱ्यावर बिबट मादी व दोन पिल्लं आढळून आली. त्यांनी ही माहिती गावात देताच घटनास्थळी शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली. यामुळे मादी व एक पिल्लू ऊसाच्या शेतात गेले; पण सदर पिल्लाच्या पायाला जखम असल्याने ते धुऱ्यावरील झाडाच्या पाठीमागे दडले. याबाबतची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे, क्षेत्र सहायक के.एस. वाटकर, वनरक्षक पिसे, वनमजूर वाटकर, पिपल्स फॉर अॅनिमलचे कौस्तुभ गावंडे हे घटनास्थळी दाखल झाले. जमावाला दूर करण्यात आले, तरी ते पिल्लू गेले नाही. यामुळे पिल्लाची शारीरिक तपासणी करण्यात आली. यात त्याच्या पायाला जखम असल्याचे दिसून आले. यावरून सदर पिल्लाला ताब्यात घेत पिपल फॉर अॅनिमल्सच्या पिपरी (मेघे) येथील करुणाश्रमात उपचाराकरिता सोपविण्यात आले.
धरणाच्या परिसरातील गावांत सातत्याने वाघांचे अस्तित्व राहत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे; पण आत बिबटाचे पिल्लू आढळल्याने ग्रामस्थांनी गर्दी केली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रसंगावधान राखून गर्दी कमी करीत पिल्लू ताब्यात घेतले.
पिल्लू करुणाश्रमात
जखमी पिल्लावर उपचार करण्याकरिता त्याला पिपल्स फॉर अॅनिमल्सच्या करुणाश्रमात ठेवण्यात आले आहे. बिबटाचे पिल्लू डरकाळी फोडेल तेव्हा बिबट मादी डरकाळी फोडून त्याला प्रतिसाद देत होती.
तीन तास विश्रांती देऊन त्याला मूळ जागेवर सोडणार होतो; पण नंतर त्याच्या शारीरिक तपासणीत पायाला जखम दिसून आली. सदर बिबटाचे पिल्लू एक महिन्याचे आहे. बिबट मादीवर लक्ष देण्यात येईल. दोन-तीन दिवसांत जखम बरी झाली की त्याला मातेच्या स्वाधीन केले जाईल.
- पी.एम. वाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी.