लेखा कर्मचाऱ्यांचे सातव्या दिवशी लेखणीबंद आंदोलन सुरूच
By admin | Published: March 22, 2017 12:58 AM2017-03-22T00:58:34+5:302017-03-22T00:58:34+5:30
जिल्हा परिषदेतील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे.
खासदारांनी जाणून घेतल्या समस्या : पाठपुरावा करण्याचे दिले आश्वसन
वर्धा : जिल्हा परिषदेतील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. सातव्या दिवशीही आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा न निघाल्याने मंगळवारी सदर आंदोलन सुरू होते. मंगळवारी दुपारी खासदार रामदास तडस यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी मागण्यांचा निकाली निघाव्या यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सावत्रपणाची वागणूक दिल्या जात असल्याचा आरोप करीत विविध मागण्यांसाठी जि.प.तील लेखा कर्मचाऱ्यांनी सुरूवातीला काळी फित लावून निषेध आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जि. प. लेखा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशीष दहिवडे यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी योग्य पावले न उचलल्यास लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने १५ मार्च २०१७ पासून जि. प. च्या आवारात लेखा कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा न निघाल्याने मंगळवारी सातव्या दिवशी सदर आंदोलन सुरूच होते. मंगळवारी दुपारी खा. रामदास तडस यांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळी खासदार तडस यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्या. त्यावर खासदारांनी जि.प.तील लेखा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या निकाली निघण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच नगराध्यक्ष अतुल तराळे यांनीही लेखा कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळी जावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मार्च महिन्यात प्रत्येक शासकीय कार्यालयात कामाचा व्याप वाढतो. जिल्हा परिषदेतही कामाचा व्याप जास्त असतो. या आंदोलनामुळे जि.प.तील कामे खोळंबली आहे.(शहर प्रतिनिधी)