यमराजा..., नेशील तर आम्हा दोघांनाही ने..!
By admin | Published: March 9, 2016 03:05 AM2016-03-09T03:05:50+5:302016-03-09T03:05:50+5:30
तिचे वय ७७ वर्षे. आयुष्याची सायंकाळ झाली तरी जगण्याची इच्छा कायम. कारण एकच. तिचा ४३ वर्षीय अपंग मुलगा.
आईच्या मायेचे जिवंत उदाहरण : आयुष्याच्या सायंकाळीही मुलाच्या उदरनिर्वाहाकरिता देत आहे लढा
योगेश वरभे अल्लीपूर
तिचे वय ७७ वर्षे. आयुष्याची सायंकाळ झाली तरी जगण्याची इच्छा कायम. कारण एकच. तिचा ४३ वर्षीय अपंग मुलगा. ती गेल्यावर त्याचा कोणी वाली नाही. आता जगायचे ते त्याच्याचसाठी. आयुष्याचा शेवट होईल ही काळ्या दगडावरची रेष. मागणे फक्त एकच.. यमराजा, नेशील तर आम्हा दोघांनाही ने.. मला एकटीला नेऊन माझ्या पोटच्या गोळ्याला उघड्यावर सोडू नको, अशी आर्त हाक येथील अपंग पद्माकरची आई शांताबाई हिची यमराजाला आहे.
विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील पद्माकर गोविंद वाघमारे (४३) हा जन्मत:च अपंग आहे. जन्मापासून तो आजपर्यंत रांगतच आला. त्याचा वडिलाचा मृत्यू २००४ मध्ये झाला. तेव्हापासून त्याची आईच त्याचा आधार ठरली. ‘आईच्या प्रेमाला उपमा नाही’ असे म्हणतात. तोच प्रकार येथे घडत आहे. कोणी कर्ता नसल्याने म्हाताऱ्या आईवरच त्याची जबाबदारी. आज तिचे वय ७७ वर्षांवर आहे. तिही केवळ आपल्या मुलाकरिता जगत असल्याचे दिसते. यात जर तिला काही झाले तर या पद्माकरचे काय असा प्रश्न समोर येतो. आता म्हातारपणामुळे शरीर साथ देत नाही. आजारातही या दोघांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था तिच्याच माथी.
यामुळे ‘दिनानाथा आम्हा कोण वाली’ असे म्हणण्याची त्यांच्यावर वेळ आली. यामुळे आम्हा माय लेकांना एकाच दिवशी घेवून जा अशी आर्त हाक पद्माकरची आई देत असल्याचे तिच्या बोलण्यातून दिसते.
शासनाच्यावतीने अनेक योजना अस्तित्वात असल्या तरी त्याचा लाभ या लाभार्थ्यांना होत नाही. येथील पद्माकरसारखे अनेक असे जीवन जगत आहेत. त्यांच्या उद्धाराकरिता शासनाच्यावतीने काही ठोस निर्णय घेण्याची गरज वर्तविल्या जात आहे. त्यांना शासनाच्या योजनातून जगण्याच्या प्रवाहात आणण्याची गरज आहे.
अपंग-निराधार योजनांपासून ग्रामीण लाभार्थी दूरच
अपंग, निराधारांना जीवन जगताना आधार मिळावा, त्यांची हेळसांड थांबावी याकरिता शासनाच्यावतीने अनेक योजना अंमलात आणल्या. या योजनांचा लाभ घेण्याकरिता शासनाच्यावतीने असलेल्या कागदांच्या शर्यतीत ग्रामीण भागातील अनेक अपंग व निराधार मागे राहत असल्याने त्यांच्यावर वेठबिगारीचे जीणे आले आहे. जीवन व्यतित करताना अनेकांनी अखेर माधुकरी स्वीकारली असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाच्या योजना येथे कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले आहे.