यश खासबागे जिल्ह्यातून प्रथम
By admin | Published: May 31, 2017 12:39 AM2017-05-31T00:39:14+5:302017-05-31T00:39:14+5:30
विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राज्य बोर्डाच्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल
१८ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राज्य बोर्डाच्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान यशवंत महाविद्यालय वर्धाच्या यश चंद्रशेखर खासबागे याने पटकाविला. त्याने ९४.९२ टक्के गुण घेतले. तर द्वितीय स्थानी दोन विद्यार्थिनी राहिल्या. यात गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची निकीता द्वारकाप्रसाद पांडे व यशवंत महाविद्यालयाची साक्षी राजेंद्र कुळकर्णी यांचा समावेश आहे. या दोघींनीही ६१३ गुण घेतले. त्यांची टक्केवारी ९४.३० एवढी आहे. तृतीय स्थानही गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची वृशाली विजय मसने व हिंगणघाट येथील जी.बी.एम.एम. महाविद्यालयाचा सौरभ काशिनाथ आंभोरकर या दोघांनी संयुक्तरित्या राखले. त्यांनी ६१२ गुण घेतले. त्यांची टक्केवारी ९४.१५ एवढी आहे.
यंदाच्या शैक्षणिक सत्रात वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १३४ महाविद्यालयातून १८ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ९ हजार २४५ मुले तर २ हजार ९१३ मुलींचा समावेश होता. यापैकी १५ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७ हजार ४४९ मुले तर ८ हजार २९८ मुलींचा समावेश आहे. या निकालातही दिल्ली बोर्डाच्या निकालाप्रमाणे मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसून आले. जाहीर झालेल्या निकालात ८६६ विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. ४ हजार ३६५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार ३४४ द्वितीय श्रेणीत, १ हजार १७२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले
सहा महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के
जिल्ह्यात उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची १३४ विद्यालये आहेत. त्यापैकी फक्त सहा महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात म्हसाळा येथील जिजामाता सबाने विद्यालय, सेवाग्राम मार्गावरील सुशील हिंमतसिंगका विद्यालय, पुलगाव येथील लेबर कॅम्प सायन्स अॅण्ड कॉमर्स विद्यालय, पुलगाव येथील सेंट जॉन, होली फेथ ज्युनिअर कॉलेज व सेलू येथील दिपचंद चौधरी कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचा समावेश आहे.
पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ३३.३६ टक्के
जिल्ह्यातून १ हजार २७२ विद्यार्थ्यांनी पुनरपरीक्षार्थी म्हणून नामांकन दाखल केले होते. त्यापैकी १ हजार २६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४२२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ३३.३६ टक्के आहे. विज्ञान शाखेत १५१ विद्यार्थ्यांपैकी १२८, कला शाखेत ८२७ विद्यार्थ्यांपैकी २३६, वाणिज्य शाखेत ९८ विद्यार्थ्यांपैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. व्यावसायिक अभ्यासक्रमात ८९ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.