यशोदा, भदाडी झाली सैराट; शेतीपिकांची लावलीय वाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 05:00 AM2022-07-16T05:00:00+5:302022-07-16T05:00:11+5:30
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला होता. परंतु, ९ जुलैला परिसरात ढग फुटीसदृश पाऊस झाल्याने यशोदा व भदाडी नदी चांगलीच फुगली. या नदीतील पाणी सोनेगाव (आबाजी) पढेगाव, चिकणी, जामनी, निमगाव, दहेगाव, वायफड, केळपूर, डिगडोह, नांदोरा (डफरे) आदी गावांत शिरल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतातील पिके पूर्णत: खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : पावसाच्या प्रतीक्षेत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चिकणीसह परिसरात शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, सोयाबीनची लागवड केली. पण, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी पुन्हा कर्जबाजारी होऊन पेरणी केली. पिके अंकुरायला लागताच मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने परिसरातून वाहणारी यशोदा आणि भदाडी नदीही सैराट झाली आणि शेतशिवारातील पिके खरडून नेली. त्यामुळे आता तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला होता. परंतु, ९ जुलैला परिसरात ढग फुटीसदृश पाऊस झाल्याने यशोदा व भदाडी नदी चांगलीच फुगली. या नदीतील पाणी सोनेगाव (आबाजी) पढेगाव, चिकणी, जामनी, निमगाव, दहेगाव, वायफड, केळपूर, डिगडोह, नांदोरा (डफरे) आदी गावांत शिरल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतातील पिके पूर्णत: खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करून हेक्टरी २५ हजारांची नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्यात ना कृषिमंत्री, जिल्ह्यात ना पालकमंत्री
- अलीकडेच राज्यात राजकीय भूकंप झाल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तर मिळाले. पण, मंत्र्यांचे खाते वाटप झाले नसल्याने या आपत्ती काळात राज्यात ना कृषिमंत्री आहे ना जिल्ह्याला पालकमंत्री, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली व्यथा कुणाकडे मांडावी. शेतकऱ्यांचा प्रश्न कोण तडीस लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरुवातीला पावसाअभावी तर आता पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागली. आता अतिवृष्टीने सर्व पिके खरडून गेल्याने तिबार पेरणीचे सावट आहे. या आपत्ती काळात राज्याला कृषिमंत्री नाही आणि जिल्ह्याला पालकमंत्री नाही, त्यामुळे कोणाकडे मागणी करावी, हा प्रश्न आहे. शासनाने तातडीने हेक्टरी २५ हजारांची मदत करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- सतीश दाणी, राज्याध्यक्ष शेतकरी संघटना युवा आघाडी.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. याचा आढावा घेण्याकरिता जिल्ह्याला पालकमंत्रीही नाही. शेतकऱ्यांची अडचण कोण सोडविणार, हा प्रश्न आहे. शेतकऱ्याला नेहमीच अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची नुकसानभरपाई जाहीर करुन दिलासा द्यावा.
- संजय वानखेडे,शेतकरी,जामणी.