यंदा ५१५ बालके कुपोषित
By admin | Published: January 23, 2016 02:06 AM2016-01-23T02:06:26+5:302016-01-23T02:06:26+5:30
कुपोषणमुक्तीकरिता शासनाकडून आरोग्य विभाग, अंगणवाड्या तसेच अन्य विभागांमार्फत प्रयत्न होत आहे.
एनआरसी केंद्राची स्थापना : पोषण आहाराच्या योजनांनंतरही लक्ष्य असाध्यच
प्रशांत हेलोंडे वर्धा
कुपोषणमुक्तीकरिता शासनाकडून आरोग्य विभाग, अंगणवाड्या तसेच अन्य विभागांमार्फत प्रयत्न होत आहे. विविध पोषण आहाराच्या योजना राबविल्या जात आहेत; पण कुपोषणातून मुक्ती मिळताना दिसत नाही. जिल्ह्यात यावर्षीही ५१५ कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. या बालकांकरिता आता पुनर्वसन केंद्र (एनआरसी) स्थापन करण्यात आले आहे. यातून कुपोषित बालक व त्यांच्या मातांना सेवा पुरविली जाणार आहे.
कुपोषणातून मुक्ती मिळविण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. आरोग्य यंत्रणेसह अंगणवाड्यांतून कुपोषित बालके व त्यांच्या मातांचे संगोपन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुपोषित बालकांना अंगणवाड्यांतून वेगळ्या प्रकारचा पोषण आहार पुरविला जातो. शिवाय त्यांच्या मातांनाही आहार व उपचार दिले जातात. या संपूर्ण सुविधा मोफत पुरविल्या जातात. आरोग्य यंत्रणेच्या पथकाकडून अंगणवाडी केंद्रात जाऊन कुपोषित बालकांची तपासणी केली जाते. तालुकास्तरावर कुपोषित बालकांच्या सुश्रूषेकरिता व्हीसीडीसी केंद्र आहे. या बाल उपचार केंद्रात सौम्य व मध्यम गटातील कुपोषित बालक व मातेला तपासणी करीत पोषण आहार दिला जातो.
यानंतर तीव्र गटातील बालकांकरिता जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयात एनआरसी केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. यात कुपोषित बालक व त्यांच्या मातांना १४ दिवस भरती करून घेतले जाते. या १४ दिवसांची मजुरी सदर मातेला मिळते. शिवाय बालक व मातेची दररोज तपासणी होते. त्यांना पोषण आहार दिला जातो. तज्ञांकडून बालकाचे दररोज वजन व उंची मोजली जाते. १४ दिवसांत बालकाचे वजन १५ टक्केपेक्षा अधिक वाढले तर मग त्यांना सुटी दिली जाते.
वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातही एनआरसी केंद्र स्थापन करण्यात आले. या केंद्रांतर्गत कुपोषण दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात कुपोषणातून पूर्णत: मुक्ती मिळाली नसली तरी त्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात सॅम (तीव्र) प्रकारात १०७ तर मॅम (मध्यम) गटातील ४०८ बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे. यातही सर्वाधिक ११२ कुपोषित बालकांची नोंद कारंजा तालुक्यात झाल्याचेही आरोग्य यंत्रणेद्वारे कळविण्यात आले आहे.
आता प्रत्येक जिल्हा रुग्णालयात पुनर्वसन केंद्र
राज्य शासनाने कूपोषणमुक्तीकरिता एनआरसी केंद्राची स्थापना केली आहे. प्रारंभी राज्यातील केवळ आठ जिल्हा रुग्णालयांमध्ये या केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. या केंद्रातून प्रायोगिक तत्वावर कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात बऱ्यापैकी यश आल्याने आता प्रत्येक जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये एनआरसी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहार देणे व त्यांच्यावर उपचार करणे सोईचे झाले आहे.