यंदा जिल्ह्यात तुरीच्या उत्पादनात येणार हेक्टरी नऊ क्विंटलची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 05:00 AM2021-12-29T05:00:00+5:302021-12-29T05:00:12+5:30

जिल्ह्यात काही शेतकरी सलग तूर तर काही आंतरपीक म्हणून तूर  लागवड करतात. यंदा जिल्ह्यात ६६,३८४.६९ हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली. दिवाळीपूर्वी पीक परिस्थिती बघता हेक्टरी सरासरी १३.३५ क्विंटल उत्पादनाची शक्यता होती. पण दिवाळीनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहिल्याने तसेच तूर पिकावर फ्युजारियम उमड आणि फायटोप्थोरा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तूर उत्पादकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.

This year, the production of turi in the district will decrease by nine quintals per hectare | यंदा जिल्ह्यात तुरीच्या उत्पादनात येणार हेक्टरी नऊ क्विंटलची घट

यंदा जिल्ह्यात तुरीच्या उत्पादनात येणार हेक्टरी नऊ क्विंटलची घट

Next

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदा वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तूर पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परंतु मध्यंतरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिल्याने फ्युजारियम उमड आणि फायटोप्थोरा करपा या रोगाने तूर पिकावर अटॅक केल्याने तूर पीक करपत आहे. परिणामी, यंदा तुरीच्या उत्पादनात हेक्टरी नऊ क्विंटलने घट येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात काही शेतकरी सलग तूर तर काही आंतरपीक म्हणून तूर  लागवड करतात. यंदा जिल्ह्यात ६६,३८४.६९ हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली. दिवाळीपूर्वी पीक परिस्थिती बघता हेक्टरी सरासरी १३.३५ क्विंटल उत्पादनाची शक्यता होती. पण दिवाळीनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहिल्याने तसेच तूर पिकावर फ्युजारियम उमड आणि फायटोप्थोरा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तूर उत्पादकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी हिरवेगार दिसणारे तूर पीक अचानक करपायला सुरूवात झाल्याने यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. फ्युजारियम उमड आणि फायटोप्थोरा करपाचा प्रादुर्भाव मध्यंतरी जिल्ह्यावर ओढावलेल्या थंडीच्या अटॅकमुळे जिल्ह्यात यंदा तुरीचे उत्पादन हेक्टरी ४ ते ५ क्विंटल होणार आहे.

फ्युजारियम उमड
- फ्युजारियम उमड म्हणजेच मर हा रोग जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. पानाच्या शिरा पिवळ्या होतात. शिवाय पाने पिवळी पडतात. झाडाचे शेंडे मलूल होतात आणि कोमेजतात. झाड हिरव्या स्थितीत वाळते. जमिनीलगतच्या खोडाचा भाग काळ्या रंगाचा बनतो. मूळ उभे चिरले असता मुळांचा मध्य भाग काळा दिसतो. यात बुरशीची वाढ झालेली दिसते. कधीकधी खोडावर पांढरी बुरशीही आढळते.

फायटोप्थोरा करपा
-    हा रोग फायटोप्थोरा ड्रेसलेरा या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पानावर ओलसर चट्टे तसेच खोडावर तपकिरी वा गर्द तपकिरी चट्टे जमिनीलगत किंवा जमिनीपासून काही इंच अंतरावर आढळतात. नंतर हे चट्टे वाढत जाऊन खोडाभोवती खोलगट भाग तयार होतो. तसेच काही वेळा खोडावर गाठी तयार होतात. पाण्यातून व हवेद्वारे या रोगाच्या बिजाणूचा प्रसार होतो.

देवळी तालुक्याला सर्वाधिक फटका 
-    फ्युजारीयम उमड अन् फायटोप्थोरा करपा रोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव देवळी तालुक्यातील उभ्या तूर पिकावर झाला आहे. देवळी तालुक्यात यंदा ८ हजार ६८८ हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली असून, त्यापैकी तब्बल ३ हजार ४७५ हेक्टरवरील उभ्या तूर पिकाचे फ्युजारीयम उमड अन् फायटोप्थोरा करपा रोगामुळे नुकसान झाले आहे.

फ्युजारियम उमड व फायटोप्थोरा करपा या रोगामुळे जिल्ह्यातील ६६ हजार ३८४.६९ हेक्टर पैकी २७ हजार ४२३ हेक्टरवरील तूर पिकाचे नुकसान झाले आहे. दिवाळीपूर्वी जिल्ह्यात हेक्टरी १३.३५ क्विंटल तूर उत्पादनाची शक्यता होती. पण आता हेक्टरी ४ ते ५ क्विंटल उत्पादनाची शक्यता आहे.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

तूरडाळीच्या भावात येणार तेजी
तूर पिकावर फ्युजारीयम उमड अन् फायटोप्थोरा करपा रोगाचा प्रादुर्भाव वर्धा जिल्ह्यासह नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर याही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त या कारणामुळे यंदा तूरडाळीच्या भावात चांगलीच तेजी राहणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: This year, the production of turi in the district will decrease by nine quintals per hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती