यंदा सोयाबीन एकरी ५ क्विंटलच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:47 PM2018-09-29T23:47:10+5:302018-09-29T23:47:50+5:30
शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख; पण यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना हे दिवळी बोनस पीक पाहिजे तसे साथ देणार नसल्याची स्थिती आहे. यंदाच्या हंगामात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर हंगामाच्या मध्यंतरी पुन्हा पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख; पण यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना हे दिवळी बोनस पीक पाहिजे तसे साथ देणार नसल्याची स्थिती आहे. यंदाच्या हंगामात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर हंगामाच्या मध्यंतरी पुन्हा पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला. जिल्ह्यात संध्या काही ठिकाणी अर्ली सोयाबीन सवंगणी व काढणीचे काम सुरू असली तरी यंदा जिल्ह्यात एकरी सरासरी ५ क्विंटलच सोयाबन होईल असा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. उत्पादनातच घट येत असल्याने सोयाबीन उत्पादकांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात १२ हजार ३५७ हेक्टर मध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली. तर आष्टी तालुक्यात ८ हजार ६७४ हेक्टरवर, कारंजा तालुक्यात १२ हजार ०१५०, वर्धा १८ हजार ८३५, सेलू ११ हजार ४००, देवळी १६ हजार ६५५, हिंगणघाट १५ हजार ५६ तर समुद्रपूर तालुक्यात २० हजार ५४२ हेक्टरवर सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली. सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने यंदा पेरणी कशी करावी, असाच प्रश्न शेतकऱ्यांना सतावत होता. दरम्यान समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला. त्यानंतर वेळोवेळी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पिकही बऱ्यापैकी वाढले. परंतु, ज्या वेळी सोयाबीन फुलावर आले त्याच वेळी पाऊस बेपत्ता झाला. आॅगस्ट महिन्यात सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पावसाने दडी मारली. त्यामुळे शेंगांमध्ये पाहिजे तसे दाणे भरली नाहीत. त्यामुळे सध्या उत्पादनात घट येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अतिशय मेहनत घेवून नापिकीची परिस्थिती ओढावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात वेळोवेळी पाहिजे तसा पाऊस न झाल्याने याचा विपरीत परिणाम सोयाबीन पिकावर झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सरासरी हेक्टरी १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे आष्टी तालुक्यात सर्वात कमी सोयाबीनचे उतारे येण्याची शक्यता आहे.
- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.
आष्टी तालुक्यात सर्वात कमी उतारे
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील सोयाबीन पिकांच्या उताऱ्यांचा विचार केला असता हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू, वर्धा, देवळी, आर्वी, कारंजा व आष्टी अशा उतरत्या क्रमानेच तालुक्यांमधील उत्पादनात घट येणार असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्याच्या सरासरीचा विचार केला असता हेक्टरी १२ क्विंटल सोयाबीन होण्याची शक्यता आहे. तर आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी दोन क्विंटलच सोयाबीनचे उत्पन्न होण्याचे भाविक तज्ज्ञांकडून वर्तविले जात आहे.
पावसाची माथ्याकडे पाठ
वर्धा जिल्ह्याचा माथा म्हणून आष्टी व कारंजा तालुका ओळखल्या जातो. परंतु, यंदाच्या वर्षी आतापर्यंत याच परिसराकडे पावसाने पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या परिसरात जलयुक्त शिवार योजनेची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. परंतु, समाधानकारक पाऊसच या परिसरात झाल्या नसल्याने अनेक बांध व बंधारे सध्या तळ दाखवत आहेत. कमी पावसामुळे व भविष्यात जोरदार पाऊस न झाल्यास या भागातील नागरिकांसह शेतकºयांना जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.
नऊ ठिकाणी आढळले भेसळ बियाणे
दोन शेतकºयांकडून बियाण्यांमध्ये भेसळ असल्याची तक्रार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. तर कृषी विभागाच्या पाहणीत सात ठिकाणी भेसळ बियाणे आढळून आले आहेत. भेसळ बियाणे साहूर, धाडी, रुद्रापूर आदी ठिकाणी आढळून आले आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभाग सध्या योग्य कार्यवाहीही करीत आहे.