यंदा कावळ्यांची घरटी अधिक उंच; कमी पावसाचा संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:15 PM2018-06-04T13:15:54+5:302018-06-04T13:15:54+5:30
यंदा वर्धा जिल्ह्यातल्या चिकणी जामणी या गावात कावळ्याने आपले घरटे झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर बांधलेले आढळून आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: कावळ्याचे घरटे पावसात वाहून जाण्याची गोष्ट गाण्यातून आपण सर्वांनी लहानपणी ऐकलीच असेल. मात्र कावळ्याचे घरटे प्रत्यक्षात फार भक्कम असते व ते वादळवाऱ्याला खंबीरपणे तोंड देऊ शकते. तसेच कावळ्याने आपले घरटे झाडावर किती उंचीवर बांधले आहे यावरून यंदाच्या पर्जन्यमानाचा अंदाज शेतकरी बांधत असतात. यंदा वर्धा जिल्ह्यातल्या चिकणी जामणी या गावात कावळ्याने आपले घरटे झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर बांधलेले आढळून आले आहे.
रोहिणी नक्षत्रापासून कावळे आपले घरटे बांधण्याचे काम सुरू करतात. रोहिणी ते मृग नक्षत्रादरम्यान त्यांच्या विणीचा हंगाम असतो. कावळ्याच्या घरट्याचे वैशिष्ट्य हे की, ते काड्या व तारांचे तुकडे धुवून वापरत असतात. तारांमुळे या घरट्याला भक्कमपणा येतो. कुठल्याही वादळात ते खाली पडत नाही.
ज्या वर्षी कावळे आपले घरटे अधिक उंचीवर बांधतात त्या वर्षी पाऊस कमी येणार असल्याचा समज ग्रामीण भागात आहे. या वर्षीही कावळ्यानी बांधलेले घरटे अधिक उंचीवरचे असल्याने कमी पावसाचा अंदाज बांधला जातो आहे. कावळ्याच्या घरट्यांमध्ये कोकीळ पक्षी आपली अंडी टाकतो. कावळाच त्या अंड्यांना उबवतो असा एक समज आहे.