केळीच्या खोडव्यातून मिळविले लाखोंचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:03 PM2018-11-02T22:03:47+5:302018-11-02T22:04:35+5:30
ग्रामसेवकाची सरकारी नोकरी सोडून कुंदन वाघमारे यांनी शेतीची कास धरली. जिल्ह्यातील वर्धा व सेलू तालुका हे केळीचे मुख्य पीक घेणारे क्षेत्र, परंतु वाढते तापमान व घटत चाललेली पाणी पातळी यामुळे हे पीक या भागातून जवळ-जवळ नामशेष झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : ग्रामसेवकाची सरकारी नोकरी सोडून कुंदन वाघमारे यांनी शेतीची कास धरली. जिल्ह्यातील वर्धा व सेलू तालुका हे केळीचे मुख्य पीक घेणारे क्षेत्र, परंतु वाढते तापमान व घटत चाललेली पाणी पातळी यामुळे हे पीक या भागातून जवळ-जवळ नामशेष झाले होते. परंतु वाघमारे यांनी जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा चंग बांधला. जळगाव येथील जैन फार्मला भेट देऊन तिथली माहिती गोळा केली. मार्च २०१७ ला जैन फार्मसकडून गॅ्रन्ड ९ नावाची केळीची टिश्यू बेण आणून लागवड केली. पाच एकराच ६२०० झाडे बसली. अकरा महिन्यात सदर पिकातून उत्पन्न आले. भाव चांगला असल्यामुळे त्यांना जवळपास २० लाख रू. मिळाले तर खर्च आला ४ लाख रू. इथून त्यांना बळ मिळाले व त्यांनी त्याच जागेवरील मुख्य झाड अर्धे तोडून त्याचे एक पिल वाढविणे सुरू केले. त्याचे उत्पन्नही नुकतेच सुरू झाले असून त्याचा सुद्धा घड मुख्य पिकाच्या घडाएवढाच मिळत आहे. खर्च मात्र ५ एकरासाठी फक्त ७० हजार एवढा झाला. सहसा केळी पिकाचा खोडवा घेऊ नये असा प्रघात होता. परंतु वाघमारे यांनी त्यांला बगल देत खोडवा पिक घेतले व उत्पादन ही घेत आहे. त्यांचा तिसरा खोडवाही घेण्याचा विचार असून त्यांनी मिळविलेल्या माहितीनुसार मुख्य पिकाला छाटल्यानंतर त्यात असलेले अन्नद्रव्य त्याला लागून असलेल्या पिलाला मिळते. त्यामुळे खोडवा पिकाला आगाऊचे जास्त खत देण्याची गरज भासत नाही व पिकाचीही वाढ जोमात होऊन खर्चात मोठी बचत होते.
केळीची लागवड ही साधारणत: जूनच्या शेवटी किंवा जुलै महिन्यात केली जाते, परंतु वाघमारे हे मार्च पासून लागवड सुरू करतात. १ दीड महिन्याच्या अंतराने ते वेगवेगळे प्लॉट लावत असता. यामुळे त्यांची केळी वर्षभर सुरू असते. त्यामुळे त्यांना भावही चांगला मिळतो. त्यांना संपूर्ण बागेत मचींग केले असल्यामुळे त्यांचा निंदण खुरपणाचाही खर्च वाचतो. मंचींगसाठी एक एकराला १२ हजार रू. खर्च होतो. पाण्याच्या बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला असून जास्त तापमानाचा प्रभाव होऊ नये म्हणून सावरीचे कुंपण केले आहे.
३० महिन्यात मुख्य पिकासह दोन खोडक्यासचे पाच एकरात कमीत कमी ५० लाख मिळतील, असा ठाम विश्वास वाघमारे यांना आहे. पहिल्या पिकाचे २० लाख मिळवून त्याची सुरूवातही झाली आहे. वाघमारे यांचे अनुकरण करायला इतर शेतकऱ्यांनी सुरवातही केली आहे.
नाविण्यपूर्ण प्रयोग
कुंदन वाघमारे शेतात केळीचेच उत्पादन घेतात. केळीसाठी विविध प्रयोग ते करतात. केळींना नत्र मूलद्रव्य मिळावे यासाठी त्यांनी मोठे टाके तयार केले आहे. त्या माध्यमातून पिकांचे संगोपन केले जाते. शिवाय उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना सुध्दा ते करतात.