तुम्ही फक्त रद्दी द्या, आम्ही नव्या कोऱ्या वह्या देऊ; वर्ध्यातला अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:23 PM2019-06-03T13:23:10+5:302019-06-03T13:25:24+5:30
सामाजिक दायित्वातून विद्यादानाचे पुण्य कमाविण्यासाठी नागरिकांकडून रद्दी घेऊन विद्यार्थ्यांना वह्या देण्याचा उपक्रम गांधी सिटी रोटरी क्लबने हाती घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शाळेत नाव टाकल्यानंतर शाळेकडून विद्यार्थ्यांना पुस्तक पुरविले जातात. परंतु पालकांना वह्यांवरही मोठा खर्च करावा लागतो. काहींना हा खर्चही झेपावत नाही म्हणून सामाजिक दायित्वातून विद्यादानाचे पुण्य कमाविण्यासाठी नागरिकांकडून रद्दी घेऊन विद्यार्थ्यांना वह्या देण्याचा उपक्रम गांधी सिटी रोटरी क्लबने हाती घेतला आहे. स्टार्ट अप इंडियाअंतर्गत यावर्षी हा उपक्र म राज्यभर राबविला जाणार आहे.
समाजातील प्रत्येक घटकांना आपली मुले शिकली पाहिजे, अशी रास्त अपेक्षा असते. परंतु, परिस्थितीअभावी शिक्षण घेता येत नाही. शासनाकडून मोफत शिक्षणाची व्यवस्था केली असली तरी बाबींची पूर्तता करण्याचीही काही पालकांची परिस्थिती नाही. याचीच जाणीव ठेवून गांधी सिटी रोटरी क्लबद्वारे लोकसहभागातून ‘आपण फक्त रद्दी घ्या, आम्ही नव्या कोºया वह्या देऊ’ हा उपक्रम हाती घेतला आहे. कुणालाही आर्थिक मदत न मागता आपल्या घरातील वह्या, पुस्तके व वर्तमानपत्रांची रद्दी स्वीकारून त्या रद्दीच्या मोबदल्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुरविल्या जाणार आहेत. रद्दी गोळा करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून २२ जूनपासून शाळा लागल्यानंतर प्रत्येक शाळेत सर्वांच्या सहकार्याने नव्या कोऱ्या वह्या वितरित करण्यात येणार आहेत.
संपर्क साधल्यास घरूनच रद्दी गोळा करणार
पूर्वी वस्तूच्या मोबदल्यात वस्तू असाच व्यवहार सुपरिचित होता. काळ बदलला, संदर्भ बदलले. रोटरी क्लब आॅफ गांधी सिटीच्या वतीने ‘रद्दी द्या आणि नव्या कोºया वह्या घ्या’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी आपल्या घरातील रद्दी देण्यासाठी स्थानिक रोटरी क्लबच्या सदस्यांशी संपर्क साधल्यास तेच सदस्य घरुन रद्दी गोळा करणार आहे. सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७.३० वाजतापर्यंत रद्दी संकलित केली जाते. त्यामुळे दात्यांनी या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुरविण्यासाठी रोटरी क्लबद्वारा हा उपक्रम सुरू केला असून राज्यभर राबविला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रोटरी क्लबच्या सदस्यांशी संपर्क साधून आपल्या घरातील रद्दी द्यावी. ही रद्दी वह्या बनविणाऱ्या कंपनीला दिली जाईल. त्याच्या मोबदल्यात कंपनीकडून वह्या घेतल्या जाणार आहेत.
डॉ. श्रीनिवास लेले, अध्यक्ष, गांधी सिटी रोटरी क्लब, वर्धा