तरूण तरूणींना एनसीसीचे प्रशिक्षण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:42 PM2019-01-24T22:42:16+5:302019-01-24T22:43:06+5:30
आज देशाला शिस्तबद्ध, साहसी, जागरूक व देशभक्तीने भारवलेल्या नागरिकांची नितांत गरज आहे. यासाठी एनसीसीचे सैनिकी प्रशिक्षण तरूण तरूणींना आवश्यक केले गेले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : आज देशाला शिस्तबद्ध, साहसी, जागरूक व देशभक्तीने भारवलेल्या नागरिकांची नितांत गरज आहे. यासाठी एनसीसीचे सैनिकी प्रशिक्षण तरूण तरूणींना आवश्यक केले गेले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. एनसीसीच्या वर्धापन दिनानिमित्त स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी एनसीसी छात्रसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
स्वातंत्र्य लढ्याचे शेवटचे सर सेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त एनसीसीचा वर्धापन दिन कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, २१ महाराष्ट्र बटालियनचे समादेशक, अधिकारी कर्नल पद्मभान जोशी, यशवंत संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. किशोर अहेर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय, प्रा. सी.बी. देशमुख, सुभेदार राजेश इंदुरकर, हवालदार ज्ञानेश्वर गिंडे व एनसीसी अधिकारी कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांची उपस्थिती होती.
एनसीसी दिन समारंभाची सुरूवात चित्तथरारक सैनिकी अडथळा पार प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकाने झाली. छात्र सैनिकांच्या तुकडीने शानदार पथसंचालन करून मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी महिला छात्र सैनिकांनी हम फौजी देश की धडकन है... या देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. कारगिलच्या लढाईचे दृष्य हे या वर्षीचे आकर्षण ठरले. नुकतेच सैन्यदलात सामील झालेल्या संकेत शंभरकर व जीवन समर्थ यांचा जाहीर सत्कार या वेळी करण्यात आला.
यावर्षीचे बेस्ट कॅडेटस म्हणून सिनीअर अंडर आॅफीसर संकेत काळे, ज्युनिअर अंडर आॅफीसर लोभास उघडे, अंड आॅफीसर कविता शिंदे व कॅडेट सार्जेट मेजर प्रगती मेलेकर यांना स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले.
प्रा. सुरेश देशमुख म्हणाले एनसीसीचे प्रशिक्षणातून आदर्श नागरिक घडतात व आजच्या काळात अशाच प्रशिक्षण युवकांना दिल्यास सक्षम भारताचे स्वप्न पुर्ण करता येईल तर प्राचार्य डॉ. अहेर म्हणाले साहसा शिवाय काहीच मिळत नाही व एनसीसीचे प्रशिक्षण मुलामुलींना धाडसी बनवितात. ही बाब प्रशंसनिय आहे. एनसीसी हे सैन्य दलाचे दुसरे महत्वाचे दल असून देशावर येणाऱ्या संकटांशी झुंज देण्यासाठी तसेच महत्वाकांक्षी युवा पिढी तयार करण्याचे कार्य करीत आहे असे प्रतिपादन कर्नल पी.एम. जोशी यांनी केले. तर प्राचार्य डॉ. उपाध्याय यांनी सैनिकी प्रशिक्षणातूनच सैनिकी मानसिकता बनत असते, ज्या मानसिकेतेची आजच्या पिढीला नितांत गरज आहे.
प्रास्ताविक कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर, यांनी करून एनसीसी चळवळीचे योगदान विषद केले. कार्यक्रमाचे संचालन कॅडेट संकेत हिवंज व प्रा. सुनिल राठी यांनी केले तर संतोष तुरक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यशस्वीतेकरिता अंड आॅफीसर स्वप्नील शिंगाडे, अंडर आॅफीसर धिरज कामडी, अश्विनी घोडखांदे, योगेश आदमने, आशिफ शेख, सुरज तुपे, प्रज्ञा भागवत, रसिका तुपे, पल्लवी बुरबुरे, राजेश सुरजुसे, निलेश थूल, वैभव गायकवाड, स्वप्नील मडावी व एनसीसी छात्र सैनिकांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी विद्याथी उपस्थित होते.