युवकाची चाकूने भोसकून हत्या
By Admin | Published: January 8, 2017 12:37 AM2017-01-08T00:37:35+5:302017-01-08T00:37:35+5:30
पोलिसांनी केलेल्या तडीपारीला उच्च न्यायालयात आव्हान देत ती रद्द करून वर्धा शहरात दाखल झालेल्या अनुप अशोक निंबाळकर
हिंदनगर येथील थरार : दोघांना अटक; तिघे फरार
वर्धा : पोलिसांनी केलेल्या तडीपारीला उच्च न्यायालयात आव्हान देत ती रद्द करून वर्धा शहरात दाखल झालेल्या अनुप अशोक निंबाळकर रा. हिंदनगर याची हिंदनगर परिसरातच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अन्य तिघे पसार झाले. क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
माजी न.प. उपाध्यक्ष शंकर थोरात आणि हर्षल थोरात, अशी अटकेत असलेल्या दोन आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील अन्य तिघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. मृतक अनूप हा वर्धेतून तडीपार असलेल्या सोनू निंबाळकर याचा भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप निंबाळकर व त्याचा सहकारी बबलू दुबे हे दोघे दुचाकीने शंकर थोरात याच्या घरासमोर जात होते. यावेळी थोरात यांच्या पत्नीने सोनू याच्याशी जुन्या कारणावरून वाद सुरू केला. हा वाद विकोपाला जात दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. भांडण सुरू होताच थोरात यांच्या घरात असलेले शंकर थोरात व हर्षल थोरात यांच्यासह तिघे, असे पाच जण घराच्या बाहेर आले आणि अनूप निंबाळकर याच्यावर जबर हल्ला चढविला. यावेळी त्याच्या सोबत असलेला बबलू दुबे याने पळ काढत पोलीस ठाणे गाठले.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना अनूप रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी शंकर थोरात व हर्षल थोरात या दोघांसह अन्य तिघांवर भांदविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यापैकी शंकर थोरात व हर्षल थोरात या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक केली असून इतर फरार आरोपींची नावे सांगण्यास पोलिसांकडून नकार देण्यात आला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणेदार विजय मगर यांनी दिली.(प्रतिनिधी)
उच्च न्यायालयातून केली तडीपारी रद्द
वर्धा शहर ठाण्यात दाखल असलेल्या संघटीत गुन्हेगारीच्या विविध कलमान्वये अनूप निंबाळकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय होवून अनूपची तडीपारी रद्द करण्यात आली होती
डोळ्यात मिरची पुड फेकून केले वार
क्षुल्लक कारणातून थोरात यांच्या पत्नीशी वाद सुरू असताना घरातून आलेल्या आरोपींनी अनूपच्या डोळ्यात मिरची पुड फेकली व त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. यात अनूपच्या डोक्यावर, पाठीवर व कुशीत वार करण्यात आले. यातच त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला