युवकाला दोराने बांधून मारहाण
By admin | Published: September 12, 2016 12:43 AM2016-09-12T00:43:49+5:302016-09-12T00:43:49+5:30
खरांगणा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या टेंबरी (परसोडी) येथील महिलेची छेडछाड केल्याच्या वादातून पाच जणांनी एकाला दोराने बांधून मारहाण केली.
छेड काढल्याचे प्रकरण : पाच जणांवर गुन्हा
आकोली : खरांगणा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या टेंबरी (परसोडी) येथील महिलेची छेडछाड केल्याच्या वादातून पाच जणांनी एकाला दोराने बांधून मारहाण केली. यात सदर युवक गंभीर जखमी झाला आला. त्याच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस बाबाराव मरस्कोल्हे असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, गुन्हा दाखल असलेल्या पाच जणांपैकी एकाची पत्नी विरूळ (आकाजी) येथे गेली होती. परत येताना तेजसने या महिलेला दुचाकीवर आणले. गावाजवळ दुचाकी येताच तिला कवटाळल्याची तक्रार महिलेने पोलिसात केली. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी तेजस मरस्कोल्हे याच्यावर भादंविच्या कलम ३५४ (अ) अन्वये विनयभांगाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होवूनही आरोपीला अटक करण्यात आली नाही. तो गावात फिरत असल्याचे म्हणत पाचही जणांनी त्याचा वचपा काढण्याचे ठरविले. यानुसार शनिवारी रात्री तेजस हा पाणटपरीकडे जात असताना आरोपीने तु माझ्या पत्नीची छेड का काढली असे म्हणत वाद घातला. यात राजेंद्र पंढरे, साहिल पंढरे, विक्की बैस, बंटी बैस, बबलू घरकिल्ले यांनी त्याला दोराने बांधून मारहाण केली. यात तेजस गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती घरच्यांना कळताच त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी तेजसच्या आईने खरांगणा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून या पाचही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रशांत पांडे यांच्या मार्गदर्शनात जमादार शेंडे, दिनेश गायकवाड यांच्यासह पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)