योजना पोहचविण्यासाठी युवा माहिती दूत महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 09:38 PM2018-08-16T21:38:02+5:302018-08-16T21:38:29+5:30
शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शासनाच्या या योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात युवा माहिती दूत मोलाची भूमिका बजावतील, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शासनाच्या या योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात युवा माहिती दूत मोलाची भूमिका बजावतील, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केले.
शासकीय मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात शासनाच्या युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी महेता यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करून करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या उपक्रमाची ध्वनिचित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली. यावेळी महेता बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, पोलीस अधीक्षक बसवराज तेली. सहाय्यक जिल्हाधिकारी जिंदाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. करूणा जुईकर, माजी खासदार सुरेश वाघमारे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, प्रशासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.युनिसेफच्या सहयोगाने तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती लाभार्थीपर्यंत थेटपणे पोहचविणे हे युवा माहिती दूत उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ तसेच पारंपारिक लोककलेच्या माध्यमातून केला जातो. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत न पोहचणाºया शासकीय योजना माहिती थेट त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे सहाय्य घेण्याचा युवा माहिती दूत या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे. कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत तयार करण्यात आलेली माहिती दूत उपक्रमाबाबत माहिती देणारी चित्रफित दाखविण्यात आली.