तरूणांनी ज्ञानार्थी असावे
By admin | Published: October 9, 2014 11:07 PM2014-10-09T23:07:54+5:302014-10-09T23:07:54+5:30
जी गोष्ट माहीत नसते ती माहीत करून घेणे म्हणजे ज्ञान प्राप्ती होय. स्वत: ज्ञानी होऊन प्राप्त झालेले ज्ञान इतरापर्यंत पोहचविणे हे सर्वश्रेष्ठ कार्य, नोकरी मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश असू नये तर
नवनीत देशमुख : वाचनातून होते विचारांची निर्मिती
वर्धा : जी गोष्ट माहीत नसते ती माहीत करून घेणे म्हणजे ज्ञान प्राप्ती होय. स्वत: ज्ञानी होऊन प्राप्त झालेले ज्ञान इतरापर्यंत पोहचविणे हे सर्वश्रेष्ठ कार्य, नोकरी मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश असू नये तर सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेऊनच शिक्षणाकडे वळायला हवे. ज्ञानार्थी व्यक्तीला पोटाची चिंता बाळगण्याची गरज नस्ते, परिश्रम कधीच वाया जात नाही, तरूणांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य साहित्यात असून याकरिता वाचन करावयास हवे, असे विचार कथाकार प्रा. नवनीत देशमुख यांनी व्यक्त केले.
पिपरी (मेघे) येथील जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयात मराठी अभ्यास मंंडळाच्या कार्यक्रमात प्रमुख मारगदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. पुरूषोत्तम कालभूत, उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार, मराठी विभाग प्रमुख प्रा. राजेश देशपांडे व मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष वीणालाल उपरीकर उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे मराठी अभ्यास मंडळ गठित करण्यात आले. तसेच विद्यार्थी व अभ्यास मंडळाच्या कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रा. देशमुख यांनी प्रवास ही कथा सादर केली.
यानंतर बोलताना डॉ. कालभूत म्हणाले, समाजातील प्रत्येक चांगल्या व वाईट गोष्टींची नोंद साहित्यात होत असते. साहित्य हा समाजजीवनाचा आरसा असतो, विद्यार्थी हे समाजाचे भविष्य असते, आपले भविष्य उज्वल करण्याकरिता विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्तीची कास धरावी, शिक्षणाचा वापर यशप्राप्ती तसेच व्यक्तिमत्वाच्या विकासाकरिता करावा, असे आवाहन केले. तसेच प्रा. सुरेश पवार यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मराठी विभाग प्रमुखांनी मंडळाची भुमिका विशद केली. तसेच मंडळाकडून राबवित असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. राजेश देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली मसने यांनी केले तर आभार प्रदर्शन वीणालाल उपरीकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनाला सदस्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)