आताच्या नेतृत्वाला कीड लागल्याने तरुणांनी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 11:52 PM2018-12-05T23:52:23+5:302018-12-05T23:54:14+5:30
आम्ही शेतकऱ्यांच्या मुला या उपक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे मत जाणून घेण्याचे काम केले. त्यावेळी सुमारे १० हजाराच्यावर तरुण-तरुणींनी आमच्याकडे अप्रत्यक्ष समर्थन पत्र सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आम्ही शेतकऱ्यांच्या मुला या उपक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे मत जाणून घेण्याचे काम केले. त्यावेळी सुमारे १० हजाराच्यावर तरुण-तरुणींनी आमच्याकडे अप्रत्यक्ष समर्थन पत्र सादर केले. ‘लोकजागर’ ही मदर बॉडी असून लोकजागर पक्ष हा वेगळा आहे. ताकाला जाताना भांड लपविणारे आम्ही नाही. महाराष्ट्रातील जनतेसाठी लोकजागर पार्टी हा तिसरा पर्याय होऊ पाहत आहे. आताच्या नेतृत्वाला कीड लागल्याची बोचरी टीका करून ओबीसी समाज बांधवांचे नेतृत्व करण्यासाठी तरुण-तरुणींनी पुढे आले पाहिजे, असे लोकजागरचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी सांगितले.
‘ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार’ हे ब्रीद वाक्य घेऊन नागपूर येथून सुरू झालेल्या विदर्भव्यापी लोकजागर यात्रेचा समारोप बुधवारी स्थानिक सर्कस मैदानावर झाला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर पॉलिटीकल युनिटी कॅम्पेनचे संयोजक ईस्माईल बाटलीवाला, बी.एम. खान, जयप्रकाश पवार, डी. व्ही. पडीले, मनिष नांदे, सुधीर पांगुळ, बाबाराव भोयर, मुन्ना काझी, गुणेश्वर आरीकर आदींची उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना ईस्माईल बाटलीवाला म्हणाले, या देशातून गोरे फिरंगी गेले असले तरी काळे फिरंगी कायम आहेत. इतकेच नव्हे तर ते काळे फिरंगी शासकीय संपत्ती आपली समजून त्यावर बसले आहेत. काळ्या फिरंगींनी भोळ्या भाबड्या जनतेला गोºया फिरंगींसारखे पुन्हा एकदा गुलाब बनविले आहे. या काळ्या फिरंगींचा आता गळा दाबण्याची वेळ आली आहे. त्यासाठी वाकुडकर आवाहन करीत असून त्यांच्या लढ्यात जनतेनेही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सध्या काहींकडून संविधान आणि तिरंगा बदलविण्याचे प्रयत्न होत आहे. ते आम्ही खपवून घेणार नाही. शिवाय तिरंगा अन् संविधान बदलविण्याचे प्रयत्न जनतेने हाणून पाडले पाहिजे. संविधान भारतीय पवित्र ग्रंथच आहे. सध्याचे काळे फिरंगी मंदीर आणि मशीदच्या नावाखाली काहीजण दिशाभूल करून जनतेलाच लुटत आहेत. ते जनतेनेही वेळीच ओळखण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. डॉ. रमेश पिसे म्हणाले की, ओबीसी मध्ये सुमारे ३०० जाती आहेत. त्यांची लोकसंख्या ५२ टक्के आहे. परंतु, त्यांच्यासाठी १९ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. असे असताना केवळ ३ टक्के लोकसंख्या असणाºया एका जातीसाठी १६ टक्के आरक्षण मागीतले जात आहे. आमचा कुणाच्याही आरक्षणाला विरोध नाही. परंतु, सरकारने ओबीसींची जनगणना करून त्यांना त्यांचे हक्क द्यावे, असे सांगितले. मनोगत व्यक्त करताना पडीले यांनी मराठवाड्यातील ओबीसी बांधवांच्या व्यथा मांडल्या. सरकारने ओबीसींची जनगणना करावी, असे भोयर म्हणाले. प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाची ताकद ओळखली पाहिजे. शिवाय चांगल्या लोकांनी राजकारणात याचला पाहिजे, असे याप्रसंगी जयप्रकाश पवार यांनी सांगितले. याप्रसंगी बी.एम. खान यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मनीष नांदे यांनी केले.
लोकजागरच्या अध्यक्षपदाची दुरा मिरगे यांच्याकडे
सदर कार्यक्रमात प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या लोकजागर अभियानाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी महादेव मिरगे यांच्याकडे सोपविली. सदर नियुक्ती जाहीर करण्यात आल्यावर बाटलीवाला यांच्या हस्ते मिरगे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.