ठाण्यातून अल्पवयीन मुलासह युवतीचे पलायन, वर्ध्यात घेतला आश्रय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 06:12 PM2024-12-04T18:12:08+5:302024-12-04T18:16:34+5:30
लिव्ह इन रिलेशनशिपचा करार : संपूर्ण कुटुंबाचेही केले समुपदेशन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अल्पवयीन मुलाचे त्याच्यापेक्षा चार वर्षे मोठ्या युवतीशी मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. कुटुंबियांना माहिती पडताच विरोध सुरू झाला. यावर तोडगा म्हणून दोघांनीही ठाण्यातून पलायन करून मध्यस्थांच्या मदतीने वर्धा गाठले. युवतीच्या शोधात पोलिस आणि मुला-मुलीचे कुटुंब वर्धा येथे पोहोचले. येथे सखी वनस्टॉपच्या मदतीने दोन्ही कुटुंबांचे मनोमिलन घडवून आणून पुढील होणारा अनर्थ टाळला गेला.
ठाणे येथील रहिवासी वृषाली नामक २४ वर्षांची तरुणी तर वाशिम जिल्ह्यातील २० वर्षांचा अल्पवयीन युवक रितेश कामानिमित्ताने गोरेगाव येथे मामाच्या मदतीने पोहोचला. तिथेच वृषालीसोबत त्याची ओळख झाली. त्यांच्यात मित्रता वाढली, भेटीगाठी वाढल्या. यातच त्यांचे सूत जुळले. सोबत एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या. पण मुलाचे वय, शिक्षण, गरिबी ही समस्या निर्माण झाली. वृषालीच्या कुटुंबाकडून याला विरोध होऊ लागला. यावर उपाय म्हणून दोघांनीही पळून जाऊन लग्न करून एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला.
१२ नोव्हेंबरला ठाण्यातून पळ काढला. इकडे तिकडे काही दिवस घालविले. पण समाजातील वास्तव समोर आले. इज्जत, आबरू सुरक्षित नाही याची जाणीव झाली. सुरक्षित स्थळ शोधताना ओळखीच्या रवि नागपुरे याच्या मदतीने त्याच्या ओळखीच्या व बहीण मानलेल्या पठाण या मुस्लिम महिलेने दोघांनाही मदत करण्याचे ठरवून त्यांना वर्धा येथे आश्रय दिला. तिकडे १३ नोव्हेंबरला मुलीच्या आईवडिलांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात मुलगी पळवून नेल्याची तक्रार नोंदवली. पोलिस सक्रिय होत आश्रय देणाऱ्याचा शोध घेत पोलिस वर्धा येथे मुला-मुलीच्या कुटुंबियांसोबत दाखल झाले.
'अंनिस'च्या पुढाकाराने प्रेमवीरांचे मनोमिलन
- घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गजेंद्र सुरकार यांना मिळाली. त्यांनी दोन्ही प्रेमवीरांचे समुपदेशन केले. गजेंद्र सुरकार यांना पोलिसांचा फोन आला. रितेश व वृषाली यांचे लग्न केल्यास कायदेशीर कारवाई होईल, अशी तंबी दिली.
- अशा प्रकरणात भविष्यातील धोका लक्षात घेता पोलिस कारवाई टाळण्यासाठी मुलीला सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या सखी वन स्टॉपला मदत मागितली. मुलीला सेंटरला सुरक्षा दिली.
- घटनेची माहिती पोलिसांना दिली. ३० नोव्हेंबरला पोलिस कर्मचारी भूषण महाजन व दोन्ही कुटुंब एकत्रित आले. दोघांचेही समुपदेशन करून दोघांचेही लग्न लावून देण्याचा निर्णय झाला.
पलायन करताच केला लिव्ह इन रिलेशनशिपचा करार
पोलिस कारवाईची शक्यता असल्याने दोघांनीही पलायन करताच लिव्ह इन रिसेशनशिपचा दोघांत करार करण्यात आला. गजेंद्र सुरकार व रेश्मा रघाटाटे यांनी त्याला प्रतिसाद देत मुलाचे लग्नाचे वय २१ झाल्याबरोबर त्यांचे लग्न लावून देण्याचे ठरविले. मुलीला रितेशच्या आईने सर्वांसमोर स्वीकारण्याचे वचन दिले. मुलीच्या वडिलांनी व आईनेही लग्न लावून देण्याचा शब्द सर्वांसमोर दिला. दोघांनीही लग्न होईपर्यंत कायदेशीर करार करून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे दोन्ही कुटुंब यांच्या सहमतीने ठरविले. यावेळी आय. टी. स्टॉपचे प्रमुख शेषराव राठोड, परिचारिका शुभांगी दुपारे, सुरक्षारक्षक आशिष भरणे यांनी सहकार्य केले.
"कुटुंब व्यवस्था टिकून राहणे महत्त्वाचे आहे. मुलाला २१ वर्षे पूर्ण व्हायला एक महिना वेळ आहे. समुपदेशातून दोन्ही कुटुंबियांना समज देण्यात यश आल्याने मुलीचे माहेर कायम राहणार आहे. सध्या शहरात दोघेही एकत्र राहत आहेत."
- रेश्मा रघटाटे, केंद्र प्रशासक, सखी वन स्टॉप सेंटर वर्धा.