युवावर्गाला आता ‘ऑनलाईन क्वीन’ची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 05:00 AM2019-12-25T05:00:00+5:302019-12-25T05:00:10+5:30
स्मार्टफोनमधील अॅडव्हान्स फिचर्सबरोबरच ‘गेम्स’ चेही मोठे आकर्षण आहे. प्रारंभी लुडो गेमने घातलेला धुमाकूळ त्यानंतर लागलेले ‘पब्जी’चे वेड सर्वश्रुत आहे. त्याच्या जोडीला आता ऑनलाईन ‘क्वीन’ची भुरळ पडली असून जुन्या पुराण्या कॅरमच्या खेळाचा हा ऑनलाईन अवतार सर्वांच्याच पसंतीला उतरला आहे. युवावर्ग या खेळामध्ये गुंतत तासन्तास ऑनलाईन राहत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : युवा वर्गात स्मार्टफोनमधील अॅडव्हान्स फिचर्सबरोबरच ‘गेम्स’ चेही मोठे आकर्षण आहे. प्रारंभी लुडो गेमने घातलेला धुमाकूळ त्यानंतर लागलेले ‘पब्जी’चे वेड सर्वश्रुत आहे. त्याच्या जोडीला आता ऑनलाईन ‘क्वीन’ची भुरळ पडली असून जुन्या पुराण्या कॅरमच्या खेळाचा हा ऑनलाईन अवतार सर्वांच्याच पसंतीला उतरला आहे. युवावर्ग या खेळामध्ये गुंतत तासन्तास ऑनलाईन राहत आहे.
स्मार्टफोनचा वाढलेला वापर आणि त्याचे दुष्परिणाम हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. सुरूवातीला स्मार्टफोनचे आकर्षण होते. त्यात आता ऑनलाईन गेम्सची भर पडली आहे. इंटरनेटची स्पीड, कनेक्टिव्हीटी, मोबाईल स्टोअरेज, रॅम अशा अडचणी प्रारंभीच्या काळात होत्या. त्या दूर झाल्याने मोबाईलचा अमर्याद वापर सुरू झाला. त्यापाठोपाठ गेम्सचे आकर्षण वाढले असून प्रारंभी लुडोने घातलेला धुमाकूळ आणि त्यानंतर युवा वर्गाला पब्जी या गेमचे अक्षरश: वेड लागले आहे. या गेममुळे काहीजणांचे मानसिक संतुलन ढासळणे, विचित्र पद्धतीने वागणे, आत्महत्या केल्याचा दावाही अनेकांनी केला. या खेळाची ‘क्रेझ’ अजूनही कायम असली तरी त्याच्या जोडीला आता जुन्या पुराण्या कॅरमचा आॅनलाईन अवतार युवा वर्गाच्या पसंतीला उतरला आहे. कॅरम बोर्डावर खेळल्या जाणाऱ्या खेळात ‘क्विन’चे आकर्षण सर्वांनाच होते. संपूर्ण गेमचा निकालच या क्विनवर अवलंबून असायचा, तेच आकर्षण आता ऑनलाईन स्वरूपात कायम आहे. ‘डिस्क पूल कॅरम’ या नावाने हा ऑनलाईन गेम असून यामध्ये तीन पध्दतीने खेळ खेळता येतो. फेसबुकवर लॉगईन केल्यास आपल्या फ्रेंड्ससोबत तसेच अगदी परदेशातील अनोळखी खेळाडुंसोबतही हा खेळ खेळता येतो. पारंपारिक पद्धतीने खेळल्या जाणाºया कॅरमऐवढीच रंजकता कायम असल्याने याचे युजर्स वाढतच चालले आहेत. यामध्ये पब्जी किंवा इतर गेम्ससारखी मारधाड, गोळीबार नसला तरी यामुळे होणारा वेळेचा अपव्यय युवा वर्गासाठी निश्चितच घातक ठरू शकतो.
डोळ्यांचे आरोग्य धोक्यात
स्मार्टफोनची प्रकाशकिरणे खूप वेगवेगळ्या प्रकारे डोळ्यांना इजा पोहचवितात. मोबाईल स्क्रीनकडे एकटक पाहत असतो. त्यामुळे डोळ्यात परिपूर्ण पाणी बनू शकत नाही. यामुळे डोळे सुकून जातात. परिणामी, डोळ्यांची आग होणे, कचकच करणे, डोळा लाल होणे आदी त्रास नेहमीचेच झाले आहेत. भडक प्रकाशामुळे डोळ्यांमध्ये मेलॅटोनीन नावाचा पदार्थ तयार होतो. यामुळे आपल्या नैसर्गिक झोपेच्या क्रियेत अडथळा निर्माण होते. रेटीनालाही ईजा होऊ शकते.
लुडोचीही चलती
स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या हाती येतानाच त्याच्या जोडीला लुडो आला. या लुडोने अगदी ग्रामीण भागातही मोठी लोकप्रियता मिळवली. ऑफलाईन असलेल्या या अॅपमुळे समोरासमोर बसून दोन किंवा त्यापेक्षा अधिक मित्रांबरोबर हा गेम खेळता येत होता. आता याचे ऑनलाईन व्हर्जनही लाँच झाले असून पब्जीची निर्माती कंपनी टेन्सेन्ट गेमनेच याची निर्मिती केली आहे. याच्या युजर्समध्येही वाढ होत आहे.