बोरगावच्या युवकाचा गोव्याला समुद्रात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 05:50 PM2018-05-24T17:50:47+5:302018-05-24T17:50:47+5:30
शहरातील एका कॅटरींगमध्ये कामावर असलेल्या बोरगाव (मेघे) येथील युवकाचा गोवा येथे समुद्रात बुडून करुण अंत झाला. ही घटना २१ मे रोजी कलंगुट बीचवर घडली. आशिष संजयराव रामटेके (२०), असे मृत युवकाचे नाव आहे.
वर्धा - शहरातील एका कॅटरींगमध्ये कामावर असलेल्या बोरगाव (मेघे) येथील युवकाचा गोवा येथे समुद्रात बुडून करुण अंत झाला. ही घटना २१ मे रोजी कलंगुट बीचवर घडली. आशिष संजयराव रामटेके (२०), असे मृत युवकाचे नाव आहे.
शहरातील एका कॅटरींगमध्ये आशिष कार्यरत होता. सदर कॅटरींग कंपनीला गोवा येथे एक आॅर्डर मिळाली. यावरून बोरगाव, वर्धा परिसरातील दहा युवक गोवा येथे गेले होते. ते १९ मे रोजी वर्धेतून रवाना झाला. आॅर्डरचे काम आटोपल्यानंतर २१ मे रोजी सर्व मित्र कलंगुट बीचवर फिरायला गेले होते. दरम्यान, काही मित्र समुद्रात उतरले. यातील एक मित्र समुद्राच्या खोल पाण्यात जात असल्याचे आशिषच्या लक्षात आले. यामुळे त्याने त्या मित्राला वाचविण्याचा प्रयत्न केला. हे करीत असतानाच मोठी लाट आल्याने मित्र तर वाचला; पण आशिष रामटेके याचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. या घटनेमुळे रामटेके कुटुंबीय तथा त्याच्या मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे.