खर्रा खाऊनच माझा दिल होईल बर्रा, वर्धेचा खर्रा... सोशल मीडियावर व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 04:54 PM2022-01-21T16:54:28+5:302022-01-21T18:24:51+5:30
वर्धा जिल्ह्याला राष्ट्रपुरुषांचा वारसा लाभला असताना ज्यावर शासनाने बंदी आणली आहे, त्या सुगंधीत तंबाखूवर आजची तरुणाई रॅपसाँग गात आहे.
वर्धा : बदलणाऱ्या माध्यमांप्रमाणे कलेमध्येदेखील अनेक बदल घडून आले आहेत. संगीतातील रॅपसाँग हादेखील एक असाच प्रकार आहे. पाश्चात्य देशात प्रचलित असलेल्या या प्रकाराचे वर्धेकर तरुणांनाही वेड लागल्याचे दिसून येत आहे. तरुणाईने चक्क ‘वर्ध्यातील खर्रा’ (Kharra) यावर रॅपसाँग तयार केले असून, हे साँंग आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वर्धा जिल्ह्याला राष्ट्रपुरुषांचा वारसा लाभला असताना ज्यावर शासनाने बंदी आणली आहे, त्या सुगंधीत तंबाखूवर आजची तरुणाई रॅपसाँग गात आहे. हे जिल्ह्याचे वैभव कमी करणारे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. रॅप संगीत १९८०च्या दशकात लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली. गाण्यांच्या माध्यमातून समाजात सुरू रंगभेद, शोषण, दारिद्र्य, निष्क्रिय सरकार गुन्हेगारी आदी वाईट बाबी दाखविल्या जाऊ लागल्या. त्यांच्यावर थेट टीका केली जाऊ लागली. मात्र, कालांतराने रॅप संगीतात बदल झाला आणि रॅपर आपल्या जीवनशैलीबद्दल सांगू लागले. सुंदर मुली आणि महागडे कपडे याबाबत आपल्या गाड्यात वर्णन करू लागले. अनेक रॅपर्सवर विविध जिल्ह्यात न्यायालयात खटलेदेखील सुरू आहेत.
वर्धा जिल्ह्याला महात्मा गांधी, आचार्य विनोबांसारख्या महापुरुषांचा वारसा लाभला आहे. या जिल्ह्यातील वैभव जगासमोर आणण्याची गरज असताना आजची तरुणाई थेट वर्ध्यातील खर्ऱ्यावर रॅपसाँग करताना दिसून येत आहे. 'खर्रा.. खर्रा.. खर्रा खाऊनच माझा दिल होईल बर्रा.. वर्धेचा खर्रा..' अशा या रॅप साँगच्या ओळी तरुणांच्या ओठांवर बसल्या आहेत. या गाण्यातून खर्र्याचच गुणगाण करताना तो शरीराला किती घातक ठरू शकतो याकडे तरुणाईने लक्ष देण्याची गरज आहे.
सायबर सेल लक्ष देतील काय?
आधुनिक काळात तरुणाई सोशल मीडियावर जास्त ‘ॲक्टीव्ह’ दिसते. मात्र, आपण काय करतो, काय पाहतो, काय सर्च करतो, याचे भान ठेवत नाही. असाच प्रकार वर्ध्यातील काही तरुणांकडून झाला असून, त्यांनी चक्क वर्ध्यातील खर्ऱ्यावरच रॅपसाँग तयार केले असून, हा प्रकार जिल्ह्याचे नाव खराब करण्याचाच एक प्रकार आहे. त्यामुळे सायबर सेलने याकडेही लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.