युवकांनी क्षमतेचा वापर करुन उद्योगधंदा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:45 AM2017-10-13T00:45:28+5:302017-10-13T00:46:12+5:30
युवकांनी स्वत:मधील क्षमता ओळखावी. क्षमता असतानाही युवक उद्योगधंदा करण्यास पूढे का येत नाही, असा सवालही त्यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : युवकांनी स्वत:मधील क्षमता ओळखावी. क्षमता असतानाही युवक उद्योगधंदा करण्यास पूढे का येत नाही, असा सवालही त्यांनी केला. विदर्भातील सर्व प्रकारच्या शेतमालास निर्यातीची भरपूर संधी आहे; पण त्याचा पूरेपूर वापर करून घेतला जात नाही. युवकांनी आता धाडस करून उद्योगधंदा केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत प्रसिद्ध उद्योजक दामोधर तिवाडे यांनी व्यक्त केले. शिवाय उद्योगाबाबत सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
सामाजिक संघटना खैरे कुणबी समाज सेवा संस्थेच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यवसाय मार्गदर्शन विषयावर ते बोलत होते. दाते सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यात सामाजिक प्रबोधनकार भाऊ थुटे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार हरीहर पेंदे, व्यसनमुक्ती व तंबाखुमुक्ती क्षेत्रात कार्यरत हरीशचंद्र पाल, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा व्यापारी आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खैरे कुणबी बहुउद्देशीय विचारमंचचे अध्यक्ष गुणेश्वर आरीकर होते. वर्धा जिल्हा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त असून येथून सुरू केलेले कार्य कधीही अयशस्वी होत नाही. संस्थेने सुरू केलेले कार्य अभिनंदनीय आहे, असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक तथा सिनेकलावंत डॉ. बळवंत भोयर यांनी व्यक्त केले. आरीकर यांनी समाजातील हुंडाविरोधी कार्य करणे तसेच मुलींना शिक्षित करणे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, क्रीडा व कला क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच रांगोळी व मेंहदी स्पर्धेत सहभागी समाजातील मुलांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मान्यवरांचा परिचय करून देत प्रास्ताविक बाबाराव भोयर यांनी केले. संचालन चंद्रशेखर ठाकरे यांनी केले तर आभार राजेंद्र अनफाट यांनी मानले. महादेव तांगडे, बाबाराव भोयर, राजेंद्र अनफाट, दामोदर मुडे, हेमंत डंभारे, अरविंद बोटफोले, दिवाकर कोरेकार, खुशाल शेंडे, आशिष व्यापारी, नरेंद्र वाडेकर, किशोर जामनकर, राजेंद्र भोयर आदींनी सहकार्य केले.
युवकांना मार्गदर्शन
सामाजिक संघटना खैरे कुणबी समाज सेवा संस्थेने कार्यक्रमाची रूपरेशा समाज मेळाव्यापर्यंतच मर्यादित न ठेवता समाजातील युवकांना मार्गदर्शन करता यावे म्हणून व्याप्ती वाढविली. याच कार्यक्रमात युवकांना व्यवसायावर मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय मदतीची ग्वाहीदेखील मान्यवरांनी दिली. यामुळे युवकांमध्ये उत्साह होता.