ड्रायपोर्ट प्रकल्पातील संधी युवकांनी ओळखाव्या
By Admin | Published: March 23, 2017 12:51 AM2017-03-23T00:51:06+5:302017-03-23T00:51:06+5:30
जगात कंटेनर हाताळण्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ईस्टची उत्तम सेवेकरिता एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
रामदास तडस : प्रकल्पाचा मुहूर्त लवकरच साधणार
वर्धा : जगात कंटेनर हाताळण्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ईस्टची उत्तम सेवेकरिता एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. जवाहरलाल पोर्ट ट्रस्टमार्फत सिंदी (रेल्वे) येथे ड्रायपोर्ट प्रकल्प साकारत आहे. मुंबई नंतर राज्यात केवळ वर्धा जिल्ह्यात ड्रायपोर्ट प्रकल्प होणार असल्याने वाहतूक जगतामध्ये जिल्ह्याला वेगळे स्थान प्राप्त होईल. त्यामुळे पोर्ट उद्योगावर आधारीत भविष्याची गरज लक्षात घेवून व्यवसाय निर्मितीची संधी ओळखून युवकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले.
भारत सरकारच्या केंद्रीय पोत परिवहन मंत्रालय तथा जवाहरलाल नेहरू ट्रस्टच्या माध्यमातून सेलू तालुक्यातील सिंदी (रेल्वे) येथे ड्रायपोर्ट प्रकल्प साकारण्यात येणार आहे. प्रकल्पातील जमीन धारकांना अतिरिक्त सानुग्रह अनुदान वाटप कार्यक्रम नुकताच सिंदी येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगांवकर, जवाहरलाल नेहरू पोर्ट स्ट्रस्ट विश्वस्त अविनाश देव, सहाय्यक व्यवस्थापक जोशी, सिंदी रेल्वेच्या नगराध्यक्ष संगीता शेंडे, जिल्हा परिषद सदस्य विरेंद्र रणनवरे, विनोद लाखे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. शिरीष गोडे, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने उपस्थित होते.
पुढे बोलताना तडस म्हणाले, येणाऱ्या काळात सिंदी शराचे महत्त्व वाढणार असून भविष्याची गरज लक्षात घेवून शहराला वळण रस्त्याची आवश्यकता भासणार आहे. याकरिता केंद्र शासनाकडे मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. जवाहरलाल नेहरू ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सीएसआरच्या माध्यमातून जनजागृती कार्यशाळा घेत जिल्ह्यातील युवकांना या विकास प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने सामावून घ्यावे, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वेअर हाऊसची आवश्यकता भासणार आहे. शेतकऱ्यांनी खासगी उद्योजकाच्या सहाय्याने वेअर हाऊस निर्मितीकरिता पाऊले उचलावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शिवाय शेतकऱ्यांनी या कामाकरिता विलंब करू नये असेही ते म्हणाले.
यावेळी उपस्थित अतिथींनीही मार्गदर्शन केले. त्यांनीही या प्रकल्पातून युवकांनी रोजगाराची संधी निवडावी असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल रासपायले यांनी तर संचालन निलेश पोहोकर यांनी केले. कार्यक्रमाला महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रणव जोशी, सुजीत गाढे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
४५ लाभार्थ्यांना २४ कोटींची सानुग्रह मदत
नागपूर शहरातील हिंगणा टी पार्इंट येथून निघणारा डिंगडोह, मिहान एमआयडीसी मार्गे सेहडोह, सिंदी, हमदापूर, खरांगणा गोडे, सेवाग्राम पवनार या नवीन राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करून त्यावर भरीव तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी उपस्थित नागरिकांना ड्रायपोर्ट प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफित दाखविण्यात आली. तसेच प्रकल्पातील ४५ लाभार्थ्यांना सुमारे २४ कोटी रुपयांचे अतिरिक्त सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात आले.