युवकांना मिळाला प्रचारकरूपी रोजगार
By admin | Published: September 30, 2014 11:39 PM2014-09-30T23:39:56+5:302014-09-30T23:39:56+5:30
सध्या राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. प्रत्यक्ष प्रचाराला प्रारंभ झाला आहे़ यामुळे कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांसह पदाधिकारी कामाला लागले आहेत़
गौरव देशमुख - वायगाव (नि़)
सध्या राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. प्रत्यक्ष प्रचाराला प्रारंभ झाला आहे़ यामुळे कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांसह पदाधिकारी कामाला लागले आहेत़ सध्या कार्यकर्त्यांचा अभाव दिसून येत आहे़ यामुळे बेरोजगार युवकांना प्रचारकरूपी रोजगार मिळाल्याचे दिसत आहे़ यात चहा, अल्पोपहार, रात्रीचे जेवण आणि २०० ते ३०० रुपये मजुरी, असे दर ठरल्याची माहिती आहे़
निवडणुका आल्या की, बेरोजगारांच्या हाताला काम मिळते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही़ यंदा तर बेरोजगार युवक तसेच मजुरांना संधीच चालून आली आहे़ पूर्वी आघाडी व युती आणि इतर पक्ष, अपक्ष उमेदवारांचा प्रचार होत होता़ आता चार राजकीय पक्ष व अन्य उमेदवारांचा प्रचार करावयाचा असल्याने अधिक प्रचारक लागणार आहेत़ यासाठी दर ठरविण्यात आले असून सकाळी १० ते रात्री १० पर्यंत आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्याची बोली केली जात असल्याचे दिसते़ अशा प्रचारकांकडून प्रचारास प्रारंभ झाला असला तरी पक्षनिष्ठ कार्यकर्ते मात्र आजही घरच्या भाकरीवरच आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरत असल्याचे दिसते़ आघाडी व युती तुटल्याने राजकीय पक्षांचे उमेदवार विलग होऊन लढत आहेत़ यामुळे प्रचारकही अधिक लागणार आहेत़ पूर्वी गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीने एखाद्या उमेदवाराच्या पारड्यात मते टाकण्याचे आदेश दिले की, संपूर्ण गाव त्या उमेदवाराला मतदान करीत होते़ त्या काळात प्रत्येक कार्यकर्ता दिवसभर श्रम घेत उमेदवारांच्या विजयासाठी झटत होते़ दिवसभर चिवडा खाऊन सायकलने गावोगावी प्रचारासाठी फिरत होते़ आता प्रचार मोहीम ही काळानुसासर बदलली आहे. या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना खूश करण्याचे काम प्रथम उमेदवारांना करावे लागते़ दररोज जर प्रचार मोहीम सांभाळायची असेल तर दोन वेळ चहा, सकाळी अल्पोपहार, रात्री जेवण व इतर काही तसेच २०० ते ३०० रुपये मजुरीही काहींना द्यावी लागते़ यातही ईमाने इतबारे काम करणारे काही कार्यकर्ते आजही दिसतात़ काही उमेदवारांनी प्रचारासाठी नातेवाईकाचा शोध सुरू केल्याचे दिसते़ निष्ठावंत कार्यकर्त्यांची कमतरता प्रत्येक उमेदवाराला जाणवत असल्याचेही चित्र आहे़