‘युगपुरूष-महात्मा के महात्मा’ एक अनोखा नाट्यप्रयोग
By admin | Published: March 16, 2017 12:47 AM2017-03-16T00:47:01+5:302017-03-16T00:47:01+5:30
श्रीमद् राजचंद्र यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नई तालीम परिसरात ‘युगपुरूष- महात्मा के महात्मा’ हा अनोखा नाट्यप्रयोग
राजचंद्र यांचे १५० वे जयंती वर्ष : सामाजिक कार्याकरिता सेवाग्राम येथे सादरीकरण
सेवाग्राम : श्रीमद् राजचंद्र यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नई तालीम परिसरात ‘युगपुरूष- महात्मा के महात्मा’ हा अनोखा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. मोहनदास गांधी यांना गहण अध्यात्मिक ज्ञान देणारे श्रीमद् राजचंद्र यांच्यातील संबंधाची यशोगाथा या नाट्यप्रयोगातून मांडण्यात आली. यातून प्राप्त होणाऱ्या निधीचा वापर आदिवासी भागात अत्याधुनिक रुग्णालय सुरू करण्याकरिता करण्यात येणार आहे.
श्रीमद् राजचंद्र मिशन, धरमपूर, दक्षिण गुजरात या संस्थेच्या माध्यमातून हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. सामाजिक स्तरावर ही संस्था कार्यरत आहे. श्रीमद् राजचंद्र हे महात्मा गांधी यांचे अध्यात्मिक गुरू मानले जातात. जगाला सत्य व अहिंसाची देण देणाऱ्या गांधीजींना खऱ्या अर्थाने याचा बोध व प्रेरणा देण्याचे कार्य श्रीमद् राजचंद्र यांनी केले आहे. महात्मा गांधी यांच्याकरिता राजचंद्र हे महात्मा होते. म्हणून या नाटकाचे नामकरण याप्रमाणे करण्यात आले आहे.
बॅरिस्टर असलेल्या गांधीजींची जडणघडण राजचंद्र यांच्या सहवासात आणि पत्र लिखानाद्वारे होत राहिली. ‘युगपुरूष- महात्मा के महात्मा’ हे नाटक श्रीमद् रामचंद्र व महात्मा गांधी या दोन महात्मावर आधारित आहे. कलाकार, संवाद, अभिनय, संगीत, पटकथा, सजावट, प्रकाश रचना याचा प्रभावी वापर करण्यात आल्याने नाटकातील संदेश अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचतो.
श्रीमद् राजचंद्र या अध्यात्मिक युगपुरूषाचा गुजरात मधील बबानिया गावात १८६७ मध्ये जन्म झाला. २३ व्या वर्षी विशुद्ध ज्ञान व निष्काम भक्तीचा त्यांनी समन्वय प्राप्त केला. ‘आत्मसिद्धी शास्त्र’ची रचना करून तत्वज्ञान व सिद्धांत सोप्या भाषेत त्यांनी सामान्यांपर्यंत पोहचविले. त्यांचे अमृतमय बोधवचन ‘श्रीमद् राजचंद्र’ या गं्रथात संग्रहित करण्यात आले. त्यांनीच गांधीजींना अध्यात्मिक ज्ञान दिले.
गांधीजींनी १९३० मध्ये मॉडर्न रिव्यूमध्ये याविषयी लिहिले आहे. या व्यक्तीने धर्माच्या गोष्टीतून माझे हृदय जिंकले. आजपर्यंत असा प्रभाव माझ्यावर कुणी टाकू शकले नाही. या नाटकातून श्रीमद् राजचंद्र यांच्यापासून गांधीजींनी सत्य, अहिंसा ही मूल्य स्वीकारून स्वातंत्र्य चळवळीत त्याचा योग्यप्रकारे उपयोग केल्याचे दाखविण्यात आले आहे. वर्तमान युगात जगताना भौतिक सुखाच्या मागे धावणे निरर्थक असल्याची प्रेरणा यातून मिळते. जीवनाचे ध्येय काय असावे? मानवतावादी निर्भय समाज निर्माण व्हावा, असा सकारात्मक प्रभाव नाटक प्रेक्षकांवर टाकते.
श्रीमद् राजचंद्र यांचे १५० वे जयंती वर्ष असून त्यांचे शिष्य व भक्त पु. राकेशभाई यांच्या प्रेरणेने श्रीमद् राजचंद्र मिशनची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. उल्हास जाजू, भरत दोशी, गिरीश मांडविया यांची प्रमुख उपस्थिती होती. नई तालीम समितीचे कार्यकर्ता व नागरिक या नाट्यप्रयोगाला उपस्थित होते.(वार्ताहर)