जि.प.च्या रेहकी शाळेत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:31 AM2017-11-17T00:31:35+5:302017-11-17T00:31:47+5:30
शिक्षणाच्या दर्जाबाबत नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांत आता शिपायाचे काम करून घेत असल्याचा प्रकार रेहकी येथील शाळेत उघड झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : शिक्षणाच्या दर्जाबाबत नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांत आता शिपायाचे काम करून घेत असल्याचा प्रकार रेहकी येथील शाळेत उघड झाला आहे. येथील मुख्याध्यापिका मंगला कुबडे यांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांना थेट रस्ता ओलांडून पाणी आणण्यास सांगितले. यावेळी एखादा अपघात घडला तर त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेहकी येथील जि.प.च्या प्राथमिक शाळेत सोमवारी मुख्याध्यापिका कुबडे यांच्या आदेशानुसार दोन विद्यार्थ्यांना नळावरून पाणी आणण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी दोन बादली घेतल्या व पाणी आणने सुरू केले. विद्यार्थ्यांनी शाळेला लागूनच असलेल्या सेलू ते येळाकेळी या मुख्य रहदारीचा रस्ता ओलांडत पाणी आणायला सुरुवात केली. तेव्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. या रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी दगड व गिट्टीचा चुरा आहे. या परिस्थितीत अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ज्या वेळी विद्यार्थी पाणी आणत होते नेमके त्याच वेळी येळाकेळी येथून टिप्पर येत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली व त्यांनी जीव वाचविण्यासाठी पळापळ सुरू केली. यात जर एखादी घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न पालकांनी विचारला आहे.
हा प्रकार सुरू असताना शिक्षिका कमरेवर हात ठेवून तमाशा पहात होत्या हे विशेष.. शाळेत शिक्षणासाठी येणाºया विद्यार्थ्यांना शिक्षणाऐवजी शिपायाचे कामे सांगुन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकणाºया या शिक्षकांसह मुख्याध्यापिकेबाबत पालक वर्गाकडुन संताप व्यक्त केला जात आहे. मुख्य रहदारीचा रस्ता ओलांडून विद्यार्थ्यांना पाणी आणायला लावणाºया त्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
आम्ही सर्व शिक्षक आपआपल्या वर्गात अध्यापनाचे कार्य करीत होतो. दोन मुलांनी शौचास जाण्यासाठी सुटी मागितली, शाळेतील नळ आले नसल्याने पाणी आणण्यासाठी मुले शाळेसमोरील नळावर गेले, आम्ही कुणीही त्यांना शाळेत पाणी भरायला लावले नाही.
- मंगला कुबडे, मुख्याध्यापिका, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, रेहकी.
विद्यार्थ्यांना रस्ता पार करून पाणी आणायला लावणे चुकीचे आहे, नेमका काय प्रकार आहे याची चौकशी करण्याच्या सूचना विस्तार अधिकºयांना देतो. यात कुणाची चुक आढळल्यास संबधित दोषीवर कारवाई केली जाईल.
- संजय वानखेडे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सेलू