‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेती काळाची गरज
By Admin | Published: April 2, 2016 02:44 AM2016-04-02T02:44:15+5:302016-04-02T02:44:15+5:30
गत शतकात शेती तंत्रज्ञानावर रसायनांचे राज्य होते. आज जणुकीय तंत्रज्ञान प्रभावी होवू पाहत आहे. दोन्ही प्रकारचे तंत्रज्ञान पर्यावरण,
सुभाष पाळेकर : बदलत्या हवामान व शाश्वत शेतीवर मंथन
वर्धा : गत शतकात शेती तंत्रज्ञानावर रसायनांचे राज्य होते. आज जणुकीय तंत्रज्ञान प्रभावी होवू पाहत आहे. दोन्ही प्रकारचे तंत्रज्ञान पर्यावरण, जैवविविधता व मानवीय आरोग्यास हानिकारक असल्याने शाश्वत पद्धतीने जमिनीची सुपकिता टिकवून ठेवणे काळाची गरज आहे, असे मत नैसर्गिक शेतीचे जनक पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केले.
न्यू आर्टस्, कॉमर्स अॅन्ड सायन्सच्या जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे ‘बदलत्या हवामानाचा शाश्वत शेतीवर होणारा परिणाम’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वातावरणातील बदलाने निसर्ग अधिकाधिक लहरी होत आहे. कृषी क्षेत्रातील जमिनीतही घट होत आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर करून किमान जागेत अधिक उत्पादन देवू शकणारे झिरो बजेट नैसर्गिक शेतीची भारताला खऱ्या अर्थाने सुजलाम-सुफलाम करेल असे ठाम मत पाळेकर यांनी मांडले.
यावेळी मंचावर अतिरिक्त मुख्य वन संरक्षण तथा महाराष्ट्र राज्य जैवविविधता बोर्डाचे अध्यक्ष डॉ. दिलीप सिंह, डॉ. अजय पंचभाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
सृष्टीतील प्रत्येक जीव परस्परांवर अवलंबून आहे. कुठलाच जीव स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू शकत नाही. भारताला संपन्न जैवविविधतेचा वारसा लाभला असताना बदलत्या वातावरणात या वैभवाचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढकार घ्यावा, असे आवाहन डॉ.दिलीप सिंह यांनी बीज भाषणातून केले.
पहिल्या तांत्रिक सत्राचे अध्यक्ष विजय जावंधिया होते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित मालाची आधारभूत किंमत मिळणे, उत्पादन खर्च, आधारभूत हमीभाव यातील कमालीची तफावत हे शेतकऱ्यांच्या समस्यांचे मुळ कारण असल्याचे जावंधिया यांनी सांगितले. शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करत असताना काही नाविन्यपूर्ण परिणाम दिसून आल्यास त्याच्या स्वामीत्व हक्काबद्दल शेतकऱ्यांने जागृक असावे, असे मत डॉ. अजय पंचभाई यांनी व्यक्त केले.
दुसऱ्या तांत्रिक सत्रात शेत ही एक व्यवस्था समजून त्यांतील जैवविविधता वाढविणे, शेतीजन्य कचऱ्यातील पोषण द्रव्यांचा वापर, कमीजास्त उंची असणाऱ्या पिकांची ऐकमेकांसोबत लागवड करणे, एकल पिकापेक्षा बहुवीधपीक पद्धतीत सर्व पिकांची उत्पादिकता अधिक असल्याने शेतकऱ्यांने अश्या पर्यायांचा विचार करावा, असे आवाहन डॉ. संयोगिता देशमुख यांनी केले.
जगभरातील नामांकित शेती संशोधन संस्थांच्या संशोधनावरील आधारित अहवालातून रासायनिक खते, किटकनाशकांचा वापर न करता जैविक पद्धतीने जमिनीची सुपिकता वाढल्याचे निदर्शनास येत असताना सुक्ष्म जिवाणूंच्या वापरावर भर द्यावा, असे विचार डॉ. आरती शणवारे यांनी मांडले. कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल सुभाष पाळेकर यांचा महाविद्यालयातर्फे शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देवून सत्कार केला. यावेळी चेतन झाडे, दिनकर जायले, वैभव उघडे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.(स्थानिक प्रतिनिधी)