जि.प.शाळांचे प्रवेश अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:10 PM2018-03-26T22:10:37+5:302018-03-26T22:10:37+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने ‘सुर नवा ध्यास नवा जि. प. शाळेतच प्रवास हवा’चा नारा देत प्रवेश अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने ‘सुर नवा ध्यास नवा जि. प. शाळेतच प्रवास हवा’चा नारा देत प्रवेश अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला.
जि. प. सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती जयश्री गफाट तर शिक्षण समिती सदस्य त्रिलोकचंद कोहळे, शिक्षणाधिकारी (प्राथ) व्ही. पी. कानवडे यांच्यासह उपशिक्षणाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे जि.प.शाळांच्या पटसंख्येवर गत काही वर्षांपासून परिणाम होत आहे. यातून जिल्हा परिषदेच्या शाळांना मुक्त करण्यासाठी आता कात टाकली आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यापासून नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातुन शाळा नावलौकीस येत आहे. या वर्षी जि. प.च्या शिक्षण सभापती जयश्री गफाट यांच्या संकल्पनेतील प्रवेश अभियान सन २०१८-१९ ‘सुर नवा ध्यास नवा जि.प. शाळेतच प्रवास हवा’ अशी हाक देवून जि.प. शाळेमध्ये १०० टक्के प्रवेशाबाबत धुमधडाक्यात सुरुवात केली आहे. या अभियानाचा जि.प. सभागृहात एका कार्यक्रमांतर्गत शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविकातून उपशिक्षणाधिकारी सुरेश हजारे यांनी अभियानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन केंद्र प्रमुख वसंत खोडे यांनी केले तर आभार गटशिक्षणाधिकारी अशोक कोडापे यांनी मानले. याप्रसंगी सतीश आत्राम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होेते.
अभियानात शिक्षण विभागाचे लक्ष
आरटीई २००९ नुसार प्रत्येक वाडी, वस्ती, गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांला जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करणे. दाखलपात्र व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जि.प. शाळेमध्ये दाखल होण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करणे. प्रत्येक गावातील ६ ते १४ वयोगटातील एकूण बालकांपैकी काही बालके गावातील, गावाबाहेरील, इंग्रजी माध्यमांच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गावातील आमच्या जि.प. शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रयत्न करणे. जि.प. शाळा प्रवेश अभियानाची व्यापकता वाढविणेसाठी प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रचार-प्रसार करणे, व्यापक गृहभेटी, फलक व पत्रके लावणे आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानात तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे काम शिक्षण विभाग करीत आहे. या अभियानामुळे प्रत्येक तालुक्यात सभा घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी व सर्व शिक्षक प्रवेशाकरिता झपाटुन कामाला लागले आहेत. या सत्रात जि. प. शाळामध्ये १०० टक्के बालकांचा प्रवेश घडवून आणण्यासाठी गावागावात उपक्रम सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आकर्षक बॅनर्स, पत्रके, प्रभातफेºया, गृह भेटी यामुळे शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.