जि.प. व पं. स. निवडणुकीतील उमेदवारांवर आज शिक्कामोर्तब
By Admin | Published: February 7, 2017 01:06 AM2017-02-07T01:06:33+5:302017-02-07T01:06:33+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण सध्या प्रचाराच्या वाऱ्यांनी तापत आहे.
अपक्षांना मिळणार चिन्ह : अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस
वर्धा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण सध्या प्रचाराच्या वाऱ्यांनी तापत आहे. जे रिंगणात राहणार ते कामाला लागले आहेत; मात्र काहींनी नाराजीमुळे पक्षाशी बंडाळी केली तर काहींनी हौस म्हणून नामांकन दाखल केले. त्यांची मनधरणी पक्षाकडून सुरू आहे. या मनधरणीला कोण साद देत नामांकन परत घेतो आणि कोण रिंगणात दंड थोपटतो, हे उद्या मंगळवारी (दि.७) स्पष्ट होणार आहे. नामांकन परत घेण्याची उद्या अंतिम तारीख असून त्याच दिवशी अपक्षांना चिन्हही मिळणार आहे.
नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर त्याची छाननी झाली. दाखल झालेल्या नामांकनापैकी ३३ नामांकन बाद ठरले. नामांकन अर्ज दाखल करताना काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या हातून झालेल्या चूका त्यांच्याच अंगलटी आल्या. यात अनेकांना फटका बसला. यावर काहींनी आक्षेप घेतला असून त्यावर चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडीनंतर आजच्या स्थितीत निवडणूक रिंगणात एकूण ९६३ उमेदवार आहेत. यात जिल्हा परिषदेचे ३५९ तर पंचायत समितीचे एकूण ५६७ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी कोण रिंगणात राहतो आणि कोण माघार घेतो यावर उद्या शिक्कामोर्तब होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०४ जागांकरिता १६ फेबु्रवारीरोजी निवडणूक होणार आहे. यात वाढोणा आणि मोरांगणा या दोन गट आणि त्याअंतर्गत येत असलेल्या चार गणांकरिता दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यांच्याकरिता नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असले तरी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीची रंगत जिल्ह्यात सुरू झाली आहे. यात सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार रिंगणात उतरविले आहे. यात काहींनी एका पक्षाने उमेदवारी नाकरल्याने वेळीच दुसऱ्या पक्षाला हात देत उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यांचाही प्रचार सुरू झाला आहे. तर काहींनी पक्षाने तिकिट नाकरल्याने अपक्ष उमेदवारी दाखल करीत बंडखोरी केली.
या बंडखोरांच्या मनधरणीकरिता राजकीय पक्षातील जिल्हास्तरावरील नेते लागले आहेत. शिवाय उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्याशी संधान जोडणे सुरू केल्याची चर्चा आहे. यात त्यांना कितपत यश येते याचा खुलासा उद्याच होणार आहे. यात किती जण नामांकन परत घेतात आणि किती रिंगणात राहतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
अनेकांना हवे आवडीचे चिन्ह
जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता होणाऱ्या निवडणुकीत अनेक अपक्षांनी नामांकन दाखल केले. नामांकन अर्ज दाखल करतानाच त्यावर असलेल्या तीन चिन्हापैकी एका चिन्हाची निवड करण्याचा नियम आहे. यानुसार उमेदवारांनी त्यांना हव्या असलेल्या चिन्हाची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्जातूनच केली आहे. यात निवड केलेले आवडीचे चिन्ह मिळते अथवा वेळेवर दुसऱ्याच चिन्हावर निवडणूक लढवावी लागते याकडे उमेदवारांचे लक्ष आहे.