जि.प. पोटनिवडणुकीत माटे, शेळके विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 09:31 PM2019-06-24T21:31:53+5:302019-06-24T21:32:37+5:30

जिल्हा परिषदेच्या मांडगाव व झडशी क्षेत्रामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप व कॉँग्रेसने आपआपल्या जागांवर विजय मिळविला आहे. मांडगाव येथून भाजपच्या मृणाल माटे तर झडशीवरून कॉँग्रेसचे सौरभ शेळके विजयी झाले आहेत.

Zip In the bye-election, the goats won | जि.प. पोटनिवडणुकीत माटे, शेळके विजयी

जि.प. पोटनिवडणुकीत माटे, शेळके विजयी

Next
ठळक मुद्देभाजप, काँग्रेसने जागा राखल्या : वडनेर पं. स.मध्ये भाजपच्या शारदा आंबटकर यांना बहुमताचा कौल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषदेच्या मांडगाव व झडशी क्षेत्रामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप व कॉँग्रेसने आपआपल्या जागांवर विजय मिळविला आहे. मांडगाव येथून भाजपच्या मृणाल माटे तर झडशीवरून कॉँग्रेसचे सौरभ शेळके विजयी झाले आहेत. माटे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा ८०७ मतांनी पराभव केला. तर सौरभ शेळके यांनी भाजपचे भूषण पारटकर यांचा २१० मतांनी पराभव केला आहे. तसेच हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या शारदा आंबटकर ७९० मतांनी विजयी झाल्या. भाजपच्या झडशी येथील उमेदवारीबाबत एकमताने निर्णय झाला नाही. अनेक इच्छुक असताना नातलगाला उमेदवारी देण्याचा अट्टाहास करण्यात आला. त्यामुळे कॉँग्रेसने आपला गड कायम राखण्यास यश मिळविले. कॉँग्रेसच्या या यशात माजी राज्यमंत्री प्रमोद शेंडे यांचे सुपुत्र शेखर शेंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी या निवडणुकीसाठी आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती. शिवाय कॉँग्रेसमध्ये गटबाजीही या निवडणुकीत झाली नाही.
मांडगावात भाजपच्या मृणाल माटे विजयी
समुद्रपूर : मांडगाव जि.प. सदस्यपदी भाजपाच्या मृणाल हेमंत माटे यांनी ८०७ मतांनी विजय संपादित केला. सरोज माटे यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे येथील जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. २३ रोजी मतदान होऊन सोमवारी मतमोजणी करण्यात आली. विजयी उमेदवार मृणाल हेमंत माटे या दिवंगत सरोज माटे यांच्या कन्या आहेत. तर काँग्रेस व राकाँतर्फे सुरेश डांगरी आणि पंकज रमेश पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून राजकीय भविष्य आजमावले. पंकज पाटील यांना ७२८ तर सुरेश डांगरी यांना ३,९३७ मत मिळाली. तसेच मृणाल माटे यांना ४,७४४ मत मिळाल्याने त्या विजयी झाल्या. मतमोजणी प्रक्रिया तहसीलदार राजू रणवीर, नायब तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, के. डी. किरसान, तायडे, गायकवाड, पंकज वाघमोडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. माटे यांच्या विजयी सभेला किशोर दिघे, अ‍ॅड. किशोर लांबट, अ‍ॅड. अनिल लांबट, अ‍ॅड. प्रशांत लांबट, पं.स.चे सभापती कांचन मडकाम, उपसभापती योगेश फुसे, जि. प. सदस्य रोशन चौखे, संजय डेहणे, समुद्रपूरचे नगराध्यक्ष गजानन राऊत, उपाध्यक्ष वर्षा बाभूळकर आदींची उपस्थिती होती.
झडशी जि.प.चा गड काँग्रेसने राखला
सौरभ शेळके २१० मतानी विजयी : भाजपला जबर धक्का
झडशी : झडशी जिल्हा परिषद क्षेत्रात पोटनिवडणुकीत काँग्रेसचे सौरभ शेळके विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार भूषण निलय पारटकर यांचा २१० मतांनी पराभव केला.
झडशीचा गड काँग्रेसकडे कायम राखण्यात यश मिळविले. जिल्हा परिषद सदस्य विवेक हळदे यांच्या निधनामुळे या मतदार संघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेखर शेंडे यांनी सौरभ शेळके यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. सेलू तालुक्यात काँग्रेसमध्ये गटबाजी असली तरी या निवडणुकीत मात्र सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केल्याने शेळके यांना ३,८३२ मते मिळाली. तर भाजपचे भूषण पारटकर ३,६२२ मते मिळाली. शेळके २१० मतानी निवडून आले. या निवडणुकीत भाजपचे आमदार पंकज भोयर यांनी प्रतिष्ठा पणाला लावून पक्षासाठी काम केले;पण निवडणुकीत भाजपला पराभव पत्कारावा लागला. या निवडणुकीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी झाल्याने त्याचा फटकाच भाजपला बसल्याची चर्चा परिसरात होत आहे. निवडणूक रिंंगणात असलेल्या रोशन राऊत यांना १६३, विलास सिताराम राऊत ४३५, अरुण शंभरकर २७५, भागवत साबळे ४९४ मत मिळाली. तर नोटाचा वापर ४९ मतदारांनी केला. भाजपच्या तालुकाध्यक्षाने आपल्या नातलगाला उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला.
वडनेर पं.स. मध्ये भाजपला यश
हिंगणघाट : तालुक्यातील वडनेर पं.स.च्या रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाच्या शारदा नरेंद्र आंबटकर या विजयी झाल्या आहेत. त्यांना १,७२७ मते मिळाली.
त्यांनी अपक्ष उमेदवार असलेल्या जुनी पूनमकौर सोरानसिंग यांचा पराभव केला. सोरानसिंग यांना ९३७ मते मिळाली. तर राकाँच्या कोमल राजेंद्र महाजन यांना ८४४, किरण नारायण कुंभारे यांना ४०९ मत मिळाली.
आंबटकर यांनी या निवडणुकीत ७०९ मतांनी विजय संपादित केला आहे. तर ५१ मतदारांनी नोटाचा वापर केला. कविता वानखेडे यांची वडनेरच्या सरपंचपदी निवड झाल्याने त्यांनी पं.स.सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर ही निवडणूक घेण्यात आली.

Web Title: Zip In the bye-election, the goats won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.