जि.प. सभापती व उपसभापतींनी घेतला वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:15 PM2017-11-11T22:15:41+5:302017-11-11T22:15:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : पंचायत समिती आर्वी अंतर्गत माटोडा (बेनोडा) शाळेत एक शिक्षक व एक शिक्षिका असताना ते प्रार्थनेच्या वेळी उपस्थित राहत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. यावरून जि.प. शिक्षण सभापती जयश्री गफाट व पं.स. उपसभापती धर्मेंद्र राऊत यांनी आकस्मिक भेट दिली. यावेळी सर्व प्रकार उघडकीस आला. १०.३० पासून उपस्थित विद्यार्थ्यांची प्रथम प्रार्थना घेऊन नंतर त्यांनी क्लास घेतला.
प्राप्त माहितीनुसार, आर्वी पं.स. अंतर्गत येणाºया माटोडा (बेनोडा) येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक नासीर मुल्ला व सहायक शिक्षिका खोडे नेहमीच अनुपस्थित राहतात, अशा अनेक तक्रारी जि.प. शिक्षण सभापती व पं.स. उपसभापती यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शनिवारी दोन्ही पदाधिकाºयांनी आकस्मिक भेट दिली. यावेळी दोन्ही शिक्षक अनुपस्थित असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची प्रार्थना घेतली व नंतर त्यांना शिकविले. काही वेळानंतर ११.२० वाजता शाळेचे मुख्याध्यापक नासीर मुल्ला व ११.३० वाजता शिक्षिका खोडे शाळेत उपस्थित झाल्या. याप्रसंगी सभापती व उपसभापतीकडे गावातील नागरिकांनी शाळेत येऊन तक्रारीचा पाढा वाचण्यास सुरूवात केली.
तक्रारीमध्ये दोन्ही शिक्षक शाळेत वेळेवर येत नाहीत. आल्यावर जोराजोराने आपसात भांडतात. मुलांना व्यवस्थित शिकवित नाहीत. यामुळे शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावला आहे. तालुक्याला काम आहे म्हणून २ ते २.३० वाजताच्या सुमारास शाळेतून निघून जातात. अशा वेळी विद्यार्थी रामभरोसे असतात. कोणताही विद्यार्थी येथे शिक्षण घेऊ शकत नाही. यामुळे दोन्ही शिक्षकांची त्वरित बदली करावी तथा नासीर मुल्ला व खोडे यांना निलंबित करावे, असे नमूद करण्यात आले आहे. सभापती व उपसभापती यांच्यासोबत गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, समितीचे अध्यक्ष हेमराज तुमसरे, नागोराव चांभारे व अन्य उपस्थित होते.