जि.प. शिक्षकाने तयार केली शैक्षणिक ‘वेबसाईट’
By Admin | Published: September 4, 2015 02:10 AM2015-09-04T02:10:50+5:302015-09-04T02:10:50+5:30
सर्वत्र इंग्रजी माध्यम शाळांचा प्रभाव आहे. त्यातही जि.प. च्या शाळांबद्दल पालकांची अनास्था दिवसेंदिवस वाढताना दिसते.
प्रयोग ठरला जिल्ह्यात प्रथम : मुरपाड शाळा एका क्लिकवर; शिक्षक व विद्यार्थ्यांकरिताही माहिती
हिंगणघाट : सर्वत्र इंग्रजी माध्यम शाळांचा प्रभाव आहे. त्यातही जि.प. च्या शाळांबद्दल पालकांची अनास्था दिवसेंदिवस वाढताना दिसते. या परिस्थितीला सामोरे जात माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात जि.प. शाळेतील शिक्षकांनी कंबर कसून राज्यात डिजीटल क्रांतीला सुरुवात केली आहे. हिंगणघाट पं.स. मधील सावली केंद्रातील जि.प. प्राथमिक शाळा मुरपाड ही शाळा त्याचे उदाहरण आहे. मुरपाड शाळेचे शिक्षक स्वप्निल वैरागडे यांनी ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट झेडपीएसमुरपाड डॉट इन’ ही जिल्ह्यातील पहिली वेबसाईट बनविण्याचा मान मिळविला आहे.
सदर संकेतस्थळाचे उद्घाटन हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य किरण धांडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपशिक्षणाधिकारी धनराज तेलंग तर अतिथी म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता हाडेकर, पुसदकर, डंभारे यांच्यासह मुरपाड येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिभाऊ गणफाडे, उपसरपंच गणेश तिखट आदी उपस्थित होते. या संकेतस्थळावर मुरपाड प्राथमिक शाळेची संपूर्ण माहिती, शालेय समित्या, शाळेचे उपक्रम आणि शाळेबाबतची सखोल माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय शैक्षणिक वेबसाईटचा उपयोग इतर शाळांतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांनाही करता येणार आहे. यासाठी महत्त्वाची माहिती त्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही वेबसाईट तयार करण्याकरिता मुरपाड शाळेचे मुख्याध्यापक अरविंद फुलकर व सहायक शिक्षक स्वप्निल वैरागडे यांनी प्रयत्न केले. या कार्याला जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, उपशिक्षणाधिकारी तेलंग, प्राचार्य धांडे, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख सुपारे यांच्यासह शाळेतील संपूर्ण शिक्षकांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)