खासगीकरणाच्या झगमगाटात जि.प.शाळेची झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:39 PM2018-10-04T23:39:10+5:302018-10-04T23:39:32+5:30
खासगीकरणाच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा दिवसेंदिवस ओस पडत चालल्या. याकडे शासनाचेही दुर्लक्ष असल्याने या शाळांमध्ये विद्यार्थी मिळणेही कठीण झाले आहे. परंतु अशा स्थितीतही आपल्या विशेष उपक्रमातून बोदड (मलकापूर) च्या जिल्हा परिषद शाळेने चांगलीच झळाळी घेतली आहे.
देवकांत चिचाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : खासगीकरणाच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा दिवसेंदिवस ओस पडत चालल्या. याकडे शासनाचेही दुर्लक्ष असल्याने या शाळांमध्ये विद्यार्थी मिळणेही कठीण झाले आहे. परंतु अशा स्थितीतही आपल्या विशेष उपक्रमातून बोदड (मलकापूर) च्या जिल्हा परिषद शाळेने चांगलीच झळाळी घेतली आहे. शिक्षकांच्या परिश्रमातून ही शाळा सध्या रोल मॉडेल ठरत असल्याने पदाधिकारी व मान्यवरांच्या भेटीगाठीही वाढल्या आहे.
पुलगाव ते वर्धा मार्गावरील बोदड (मलकापूर) या गावातील जिल्हा परिषदेची शाळा ही या खासगीकरणाच्या झगमटाला अपवाद ठरत आहे. सध्या खासगी शाळांची इमारत, रंगरंगोटी यासह खेड्यातून शाळांपर्यंत विद्यार्थ्यांची ने-आण करण्याकरिता वाहनाची व्यवस्था, यामुळे ग्रामीण भागातील पालकही खासगी शाळांकडे आकर्षीत होत आहे.परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळातील लोंढे खासगी शाळांत जात आहे. पण, बोदडच्या शाळेतील शिक्षकांची कल्पकता, परिश्रम आणि जिज्ञासावृत्ती यामुळे या शाळेतील गळतीचे प्रमाण थांबविण्यात यश मिळाले आहे. शाळेच्या इमारतीसह वर्ग खोल्यांमध्ये अससेली आकर्षक रंग सजावट मन मोहून घेते. येथील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून वेगळे संगणक कक्ष व स्वतंत्र प्रयोगशाळाही आहे. विद्यार्जनासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने भरीव कार्य करणाऱ्या या शाळेकडे अनेकांचे लक्ष वेधले जात आहे.
या शाळेला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर, पंचायत समिती सदस्य दिलीप अग्रवाल यांनीही भेट दिली. या शाळेतील ही भरारी पाहून बँक आॅफ इंडियाचे शाखा प्रबंधक दीपक पिंप्रीकर यांनी शाळा सजावटीकरिता साहित्य पुरविले. या शाळेतील बदल इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कचऱ्यांतून साकारलीय कला
शिक्षणासोबतच जीवन जगण्याची कलाही शिकविली जाते.नेहमीच्या वापरातील दुचाकी व चारचाकी वाहनाने टायर खराब झाल्यानंतर ते फेकून दिल्या जाते किंवा जाळल्या जाते. परंतु या शाळेत ते टायर जमा करुन त्यांना आकर्षक रंग देण्यात आला. ते रंगविलेले टायर शाळेच्या बागेत लावले असून ते बागेचे संरक्षक झाले आहे.
विद्यार्थ्यांनी फु लविली परसबाग
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शाळेतच परसबागही फुलविली आहे. या परसबागेत वनस्पती औषधीसोबतच भाजीपाल्याचीही लागवड केली आहे. त्यातून परीक्षेच्या अभ्यासासोबतच कृषीचीही माहिती दिल्या जाते.
हाऊस ड्रेस संस्कृती
जिल्हा परिषदची शाळा म्हटले की, निळा पॅट व पांढरे शर्ट असा गणवेश असतो. हा गणवेश नित्याचाच असल्याने विद्यार्थीही कंटाळतात. त्यामुळे इंग्रजी शाळांप्रमाणे या शाळेतही हाऊस ड्रेस संस्कृतीचा अवलंब करण्यात आला आहे. दोन प्रकारचे गणवेश असून दोन दिवस एक आणि चार दिवस दुसरा असा गणवेश राहतात.त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेतील अनुभव येत आहे.