जि.प. निवडणुकीत अनेक विद्यमान नेत्यांना धक्का
By admin | Published: December 26, 2016 01:53 AM2016-12-26T01:53:46+5:302016-12-26T01:53:46+5:30
ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाल्याने समुद्रपूर जि.प. सर्कल कमी झाले. त्याऐवजी जाम
समुद्रपूर : ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाल्याने समुद्रपूर जि.प. सर्कल कमी झाले. त्याऐवजी जाम जि.प. सर्कल झाले. यामुळे समुद्रपूर येथील अनेक दिग्गजांना धक्का बसला. त्यांना जि.प. निवडणूक लढता येणार नाही.
जाम जि.प. सर्कल अनुसूचित जमाती महिलेकरिता राखीव झाला. यामुळे येथील गत निवडणुकीत विजयी प्रा. उषाकिरण थुटे व माजी जि.प. आरोग्य सभापती पांडुरंग उजवणे यांना या मतदार संघात लढता येणार नसल्याने त्यांची गोची झाली आहे. कांढळी जि.प. सर्कल अनु. जमातीकरिता राखीव झाले आहे. तेथील जि.प. सदस्य रिना फुसे, माजी जि.प. सदस्य सुरेंद्र कुकेकर यांनाही या निवडणुकीत बाहेर व्हावे लागणार आहे. नंदोरी जि.प. सर्कल ओबीसी महिला राखीव झाल्याने या मतदार संघात पुरूष उमेदवारांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. गिरड आणि कोरा मतदार संघ खुला असल्याने तसेच मांडगाव जि.प. सर्कल ओबीसी असल्याने या तीनही मतदार संघात तालुक्यातील दिग्गजांची उमेदवारी राहणार आहे. आपले मतदार संघ राखीव झाल्याने या तीव्र मतदार संघात घुसखोरी करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आरक्षणाने अनेक प्रस्थापितांना मोठे धक्के बसले आहे.(तालुका प्रतिनिधी)
पुलगावसह नाचणगाव, गुंजखेडामध्ये काँग्रेसला खिंडार
पुलगाव : नगर परिषदेमध्ये अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती. न.प. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सत्तारूढ काँग्रेसमध्ये दोन गट पडले. राजीव बत्रा व सुनील ब्राह्मणकर यांनी काँगे्रसला रामराम ठोकला. आता जि.प., पं.स. निवडणुकीपूर्वी शरद जगताप व पिंटू वंडलकर हे पक्षाबाहेर पडत भाजपवासी झाले. अन्य कार्यकर्तेही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
उच्च न्यायालयाने नगराध्यक्ष व पाच नगर सेवकाच्या बाजूने निकाल दिला. यातील चार नगरसेवक काँग्रेसचे होते. बतरा हे निवडणुकीपूर्वी भाजपवासी झाले तर सुनील ब्राह्मणकर यांनीही काँग्रेसला जय महाराष्ट्र केले. उर्वरित माजी नगराध्यक्ष मनीष साहू व स्मीता चव्हाण न.प. निवडणुकीपासून दूर होत तटस्थ राहिले. यामुळे शहरात काँग्रेसला खिंडार पडले. याचे पडसाद ग्रामीण भागातही उमटत आहे. नाचणगाव, गुंजखेडा येथेही काँगे्रसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. नाचगणाव येथे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी ग्रा.पं. सदस्य व काँग्रेसचे निष्ठावंत शरद जगताप, पिंटू वंडलकर यासह काहींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने खळबळ माजली. गुंजखेडा जि.प. सर्कलचे काही काँग्रेसीही भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. जि.प., पं.स. निवडणुका तोंडावर असताना काँगे्रसला खिंडार पडले तर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तालुक्यातील ६ जि.प. गटांपैकी ४ व १२ पैकी ७ गण काही वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. काँग्रेसमध्ये अशीच घसरण कायम राहिल्यास जि.प. गट आणि पं.स. गणही हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.(तालुका प्रतिनिधी)