जि.प. निवडणूक काळात सावंगी ठाणेदाराचा प्रभार काढावा
By admin | Published: January 17, 2017 01:04 AM2017-01-17T01:04:30+5:302017-01-17T01:04:30+5:30
जि.प. व पं.स. काळात सावंगी (मेघे) येथील ठाणेदार संतोष शेगावकर यांचा प्रभार काढावा, ..
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन : निवडणूक प्रभावित होण्याची भीती
वर्धा : जि.प. व पं.स. काळात सावंगी (मेघे) येथील ठाणेदार संतोष शेगावकर यांचा प्रभार काढावा, अशी तक्रारवजा मागणी जि. प. उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे सोमवारी केली आहे. सदर तक्रारीची प्रतिलिपी राज्य निवडणूक आयुक्त जगेश्वर सहारिया यांनाही पाठविली आहे.
२९ डिसेंबर २०१६ रोजी किशोर दौड, विलास दौड व अमर चौधरी सर्व रा. सावंगी(मेघे) यांनी एका कार्यक्रमात शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याची तक्रार दाखल करण्याकरिता सावंगी(मेघे) येथील पोलीस ठाण्यात गेलो असता ठाणेदार शेगावकर यांनी आपले काहीही ऐकून न घेता गेट आऊट म्हटले. उलट तू दारू पिऊन आहे. पोलीस ठाण्यात कसा आला म्हणून आपणासह कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देत अश्लील शिवीगाळ केली. इतकेच नव्हे, तर निवडणूक कशी काय लढतो, अशी धमकीहीे दिली आहे. येत्या १६ फेब्रुवारीला जि.प. निवडणूक होऊ घातली आहे. सावंगी(मेघे) जि.प. गट हा आपला मतदार संघ आहे. त्यांच्या धमकीमुळे आपली निवडणूक प्रभावित होण्याची शक्यता असून आपणावर ते खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता निवडणूक काळापर्यंत सदर ठाणेदाराचा प्रभार काढावा, याकडेही जि.प. उपाध्यक्ष कांबळे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी व निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे.
२९ डिसेंबरला घडलेल्या प्रकाराची तक्रार यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केलेली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहविभाग(ग्रामीण)चे राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडेसुद्धा रितसर तक्रार दिलेली आहे, ही बाब तक्रारीत नमुद आहे. ठाणेदार शेगावकर यांची सावंगी(मेघे) येथील कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. किशोर व विलास दौड यांच्या अवैधधंद्यांना त्यांचा भक्कम पाठींबा आहे. यापूर्वीच्या ठाणेदारांनी त्यांच्यावर केलेल्या कारवायामुळे या दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहे. सदर ठाणेदाराच्या कार्यकाळातही अवैधधंदे सुरू असताना एकही कारवाई केलेली नाही. ही बाब ठाणेदार आणि विलास व किशोर दौड यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारी आहे. यामुळेच आपणाला अपमानास्पद वागणूक मिळाली. सदर ठाणेदाराने आचार संहितेच्या काळात खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याची तक्रार आधीच केलेली आहे. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक काळापर्यंत त्यांचा प्रभार काढावा, अशी विनंतीही विलास कांबळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)