प्रचाराच्या कारणातून जि.प. व पं.स. सदस्यांत ‘फ्री-स्टाईल’
By admin | Published: May 25, 2017 12:59 AM2017-05-25T00:59:51+5:302017-05-25T00:59:51+5:30
पोटनिवडणुकीत प्रचाराच्या वादातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यामध्ये झालेली फ्री-स्टाईल शहरात चर्चिली जात आहे.
सिंदी (मेघे) चा प्रकार : रामनगर पोलिसांत गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोटनिवडणुकीत प्रचाराच्या वादातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यामध्ये झालेली फ्री-स्टाईल शहरात चर्चिली जात आहे. ही घटना सिंदी (मेघे) ग्रा.पं. अंतर्गत मंगळवारी रात्री ११.३० वाजता घडली. या घटनेमुळे सिंदी (मेघे) येथील पोटनिवडणुकीला गालबोट लागले आहे.
ग्रा.पं. निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार का करीत नाही, या कारणावरून जि.प. सदस्याने पं.स. सदस्याला मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सिंदी (मेघे) परिसरातील थूल ले-आऊट येथील पं.स. सदस्यांचे घर गाठत केला. याबाबत पं.स. सदस्य प्रशांत भगत यांनी रामनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून सिंदी (मेघे) चे जि.प. सदस्य मनीष फुसाटे, कपील चंदनखेडे, प्रफुल्ल शेंडे, मंगेश रामटेके, निशांत सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रानुसार, सिंदी (मेघे) ग्रा.पं. ची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भीम टायगर सेनेचा कार्यकर्ता असलेला नितीन कुंभारे हा उमेदवार आहे. निवडणुकीत प्रशांत भगत हे कुंभारे यांचा प्रचार का करीत नाही, यावरून मनीष फुसाटे यांच्याशी शाब्दीक चकमक झाली होती. दरम्यान, फुसाटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भगत यांचे घर गाठले. त्यांना घराबाहेर बोलवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर प्रचार केला नाही तर जीवानिशी ठार करू, अशी धमकी दिली. याबाबत भगत यांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरूद्ध भादंविच्या कलम १४३, १४८, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.