१०१ आरोपींना आणखी १४ दिवस पोलीस कोठडी; परिसरात कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 04:39 AM2020-05-01T04:39:51+5:302020-05-01T04:40:05+5:30
तर १०१ आरोपींना अटक केल्यानंतर १८ एप्रिलला डहाणू न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली होती.
कासा : गडचिंचले येथील साधूंच्या हत्याकांडातील १०१ आरोपींना गुरुवारी डहाणू न्यायालयाने आणखी १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या वेळी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १६ एप्रिल रोजी रात्री गुजरातकडे जाणाऱ्या दोन साधू व त्यांचा कारचालक यांची जमावाने हत्या केली होती. १७ एप्रिल रोजी ११० आरोपींना अटक केली होती. यापैकी ९ आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना भिवंडी बालसुधारगृहात ठेवले आहे, तर १०१ आरोपींना अटक केल्यानंतर १८ एप्रिलला डहाणू न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली होती.
या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर गुरुवारी डहाणू न्यायालयात त्यांना पुन्हा हजर करण्यात आले. त्यांच्यावरील तीन गुन्ह्यांपैकी पहिल्या दाखल गुन्ह्यात न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली, तर दुसºया दाखल गुन्ह्याकरिता तपास यंत्रणेने पोलीस कोठडीची केलेली मागणी न्यायालयाने मान्य करून १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तिसºया गुन्ह्याची एफआयआरची कॉपी न्यायालयाला प्राप्त न झाल्याने त्याबाबतची सुनावणी होऊ शकली नसल्याची माहिती या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाचे वकीलपत्र घेतलेले अॅड. परमानंद ओझा यांनी दिली.